भिवंडी : मुस्लिमबहुल भिवंडी शहरात काल आणि आज बकरी ईद हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बकरी ईद निमित्ताने शहरात विविध ठिकाणी तात्पुरती ५६ कुर्बानी सेंटर तयार करण्यात आली होती. त्यामध्ये जनावरांची नोंद करून त्यांची कुर्बानी केली जात होती.
काल सोमवारी पाहिल्या दिवशी शहरात कुर्बानी सेंटरवर म्हैस, रेडा,व पारडे अशा ५१४८ जनावरांची कुर्बानी देण्यात आली. महापालिका
बकरी ईद प्रभाग समिती क्र.१ ते ५ मधील अहवालानुसार कुर्बानी जनावरांची संख्या ५१४८ झाली व स्लॉटर फी वसुली १० लाख २९,२०० रुपये प्राप्त झाली. मंगळवारी मनपा प्रशासनाने जनावरांच्या कुर्बानीतून दोन लाख ७५ हजार रुपयांची स्लॉटर फी वसूल केली आहे. आज मंगळवारी एकूण १३८६ जनावरांची कुर्बानी देण्यात आली. यामध्ये प्र.स.क्र.१ ते ५ मध्ये बोकड आणि मेंढ्यांची संख्या एकूण नऊ आहे. म्हैस, रेडा, पाडा यांची संख्या एकूण १३७७ आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाला दोन दिवसांत एकूण १३ लाख ५० हजार ५० रुपयांचे आर्थिक उत्पन्न प्राप्त झाले आहे.
काल सोमवार रोजी १७ जून रोजी मनपाने कुर्बानी केंद्रातून जमा झालेल्या जनावरांचे अवशेष, अपशिष्टांच्या घाणीच्या एकूण १८१ गाड्या तर १८ जून रोजी १०३ गाड्या इदगाह स्लॉटर हाऊस येथे खाली केल्या. त्यासाठी मोठे खड्डे खोदून त्या ठिकाणी ही घाण पुरण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.
आरोग्य विभागाने नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कुर्बानी केंद्राच्या परिसरात जंतूनाशक औषध फवारणी केली आहे. सदर ठिकाणी साफसफाई पाणीपुरवठा, स्वच्छता, जंतुनाशक औषध फवारणी, तसेच जनावरांचे अवशेष उचलून नेण्याकरता पुरेशा प्लास्टिक बॅग, जनावरांचे अवशेष याची विल्हेवाट लावण्याकरता वाहतूक बंदिस्त ट्रान्सपोर्ट व्यवस्था करण्यात आली होती.
पोलीस विभागाकडून शहरात पुरेसा पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात आला होता. तसेच पशुवैद्यकीय विभागाकडून १२० पशुवैद्यकीय अधिकारी प्राप्त झाले होते. त्यांच्यामार्फत जनावरांची तपासणी करून प्रमाणपत्र घेऊन कुर्बानी देण्यात आली. बकरी ईदसारखा सण शहरात चांगल्या प्रकारे पार पाडल्याबद्दल पालिका आयुक्त वैद्य यांनी जिल्हाधिकारी ठाणे, नवनिर्वाचित खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे, आमदार रईस शेख, आमदार महेश चौगुले, तसेच अन्य सर्व लोकप्रतिनिधी, नागरिकांचे आभार मानले आहेत. सर्व अधिकारी कामगार कर्मचारी वर्ग यांनी नेमून दिलेले काम व्यवस्थित केले आहे.
पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त आरोग्य नयना ससाणे , सर्व प्रभाग अधिकारी, आरोग्य अधिकारी यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे देखील अभिनंदन केले आहे.