ठाणे, पालघरमधील दुर्गम भागाची तहान भागवणारा जलदुत

निवृत्त कार्यकारी अभियंत्याने बांधले ५०० हून अधिक चेक डॅम
ठाणे: ठाण्यातील एक जलदुत ठाणे आणि पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण व आदिवासी भागात पाण्याचा साठा वाढावा यासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसत आहे. रोटरी क्लबच्या माध्यमातून ५०० हून अधिक सिमेंट क्राँक्रीटचे चेक डॅम त्यांनी (छोटे बंधारे) बांधले आहेत. यामुळे भूगर्भात जलसाठा वाढून शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यास मदत मिळत आहे.
ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील दहा हजार एकर जमिनीची तहान भागवण्याची किमया या जलदुताने केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातून कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झालेले हेमंत जगताप सध्या एमएसआरडीसी येथे सल्लागार पदावर कार्यरत असून गेल्या २० वर्षांपासून ग्रामस्थांच्या जमिनीची तहान भागवण्यासाठी राबत आहेत. ठाणे, पालघर जिल्ह्यातील शेतकरी दुबार पीक घेऊ लागल्याने गाव-पाड्यांचा आर्थिक स्तर उंचावला आहे. शेतकरी या अभियंत्याला जलदुत म्हणून ओळखू लागले आहेत. हेमंत जगताप यांनी ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये ५०० हून अधिक सिमेंट काँक्रीटचे चेक डॅम (छोटे बंधारे) बांधले आहेत.
ठाण्यात रहाणारे हेमंत जगताप यांनी रोटरीच्या माध्यमातून वाडा तालुक्यातील नेहरोली गावात २००५ साली दगडाचा चेक डॅम (छोटा बंधारा) बांधून जिल्ह्यातील पाणी टंचाई दूर करण्याकामी सुरुवात केली. सध्या त्यांनी रोटरी आणि विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडाच्या माध्यमातून ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये चेक डॅम बांधले आहेत. एका बंधाऱ्याची २० ते ५० लक्ष लिटर पाणी साठवून ठेवण्याची क्षमता आहे. या पाण्यावर शेतकऱ्यांनी दुबार पीक घेण्यास सुरुवात केली आहे.
गाव-पाड्यातील गावकऱ्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील मार्गी लागला आहे. २०१०-११ मध्ये जव्हार तालुक्यातील आक्रे ग्रामपंचायत परिसरातील गावांमध्ये नळातून पाणीपुरवठा योजना देखील सुरू केली आहे. गुरेढोरे, महिलांना कपडे धुण्यासाठी जागा तयार करून दिली आहे. काही ठिकाणी गावात सार्वजनिक नळ व्यवस्था निर्माण केली असल्याची माहिती जगताप यांनी दिली.
बांधाऱ्यांच्या पाण्यावर भेंडी, काकडी, गवार, सिमला मिरची, वांगी, टोमॅटो, भोपळा, मिरची अशा पिकांसोबतच मोगऱ्याची पिके घेत आहोत. शेतकऱ्यांच्या दारांमध्ये गाय, बैल, बकऱ्या, कोंबड्या असे पाळीव पशु, पक्षी देखील दिसू लागले आहेत, असे फांगळोशी येथील लाभार्थी शेतकरी भारती शिंदे यांनी सांगितले.
या वर्षात मुरबाड, शहापूर, भिवंडी, तालुक्यातील काही ठिकाणी ४५ बंधारे बांधण्याचे लक्ष असून त्यातील २५ बंधारे अग्रक्रमाने बांधून दिले जाणार आहेत, अशी माहिती श्री.जगताप यांनी दिली.
२५ शाळांसाठी जल पुनर्वलन योजना तयार करून देण्याचे लक्ष ठेवण्यात आले असून चार ठिकाणी ही योजना पूर्ण होऊन ती यशस्वी झाली आहे.