भाईंदर: मीरा-भाईंदर पालिकेने बांधलेल्या लता मंगेशकर नाट्यगृहात पहिला प्रयोग रविवार, १३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. सध्या रंगभूमीवर गाजत असलेल्या गिरीश ओक यांच्या ‘३८ कृष्ण व्हिला’ या नाटकाच्या प्रयोगाने नाट्यगृहाचा पडदा उघडणार आहे.
पालिकेने दहिसर टोल नाक्याजवळ ‘भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृह उभारले आहे. या शहरातील हे पहिले नाट्यगृह आहे. ११ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या नाट्यगृहाचे लोकार्पण करण्यात आले होते. तेव्हापासून नाट्यगृहाच्या वापरासंदर्भात पालिकेकडून धोरण निश्चित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पालिकेने विकासकासोबत केलेल्या करारनाम्यानुसार सुरुवातीची पाच वर्षे नाट्यगृहाची देखभाल विकासक करणार आहे. येत्या १३ नोव्हेंबर रोजी पालिकेचे ‘स्वच्छता दूत’ असलेले गिरीश ओक यांनी आपला ‘३८ कृष्ण लीला’ या नाटकाचा प्रयोग करण्याची इच्छा पालिकेपुढे व्यक्त केली होती. त्यानुसार शुल्क आकारणी करून दुपारच्या सुमारास हा पहिला प्रयोग केला जाणार असल्याची माहिती पालिकेचे उपायुक्त रवी पवार यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.