संधी आहे, चंगळ करून घ्या; मत मात्र मनसेलाच द्या!

शर्मिला ठाकरे यांचे ठाणेकरांना आवाहन

ठाणे : गेल्या अडीच वर्षात सत्तेसाठी हपापलेले नेते आपण बघितले. विधानसभा निवडणुकीत उतरलेले सध्याचे सगळेच पक्ष गब्बर आहेत. तेव्हा ही उत्तम संधी आहे. मिळेल तिकडून घ्या. चंगळ करून घ्या. मात्र, तुमचं अमूल्य मत मनसेलाच द्या, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी ठाणेकरांना केले आहे.

ठाणे शहर विधानसभा मतदार संघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार अविनाश जाधव, ओवळा-माजिवड्यातील संदीप पाचंगे आणि मुंब्रा-कळवा मतदार संघातील सुशांत सुर्यराव यांच्या प्रचारार्थ मंगळवारी सायंकाळी शर्मिला ठाकरे यांच्या ठाण्यात चार विविध ठिकाणी चौक सभा पार पडल्या. यावेळी चौकसभेत बोलताना त्यांनी जाहिरपणे हे भाष्य केले.

कुणावरही टीका करायची नाही असे सांगुन त्या पुढे म्हणाल्या, देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली. यातील ४०-४५ वर्ष काँग्रेस व सहयोगी पक्ष सत्तेवर तर काही वर्ष भाजप-शिवसेना देखील सत्तेत होते. शिवसेना तर ४६ हजार कोटींचे बजेट असलेल्या मुंबई महापालिकेवर गेली २५ वर्षेत सत्तेत होती. तरी अगदी साध्या सुविधाही नागरिकांना देऊ शकत नाहीत. ज्या आहेत त्या मुलभूत सुविधांचाही पुरता बोजवारा उडालेला आहे. मुंबईत एसआरएची घरे म्हणजे अक्षरशः कोंबडयांचे खुराडी बनली आहेत. या राजकारण्यांची भूक किती असु शकते, कुठेतरी थांबा! अशी शेलकी टीका शर्मिला ठाकरे यांनी केली.

वास्तविक मुल जन्मतःच त्याच्या नोंदीवरून लोकसंख्येची कल्पना येते, त्यानुसार, भविष्यात लागणाऱ्या आरोग्य, शिक्षण आदी सोयी-सुविधा आपण का निर्माण करू शकत नाही. असा सवाल करून शर्मिला ठाकरे यांनी, सरकारची इच्छाशक्तीच नसल्याची खंत व्यक्त केली.

कोविड काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र सैनिक अविरत काम करीत होते. आणि तेव्हाचे मुख्यमंत्री घरात बसले होते, फक्त दोन वेळाच मंत्रालयात गेल्याची आठवण जागवुन शर्मिला ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
कोविड काळात आम्ही सर्वाना भेटत होतो. हे मात्र भेटायला येणाऱ्याच्या नाकात काड्या घालुन तपासल्यानंतरच भेट देत होते. असेही त्या म्हणाल्या.

अविनाश जाधव यांच्या पाठीशी उभे रहा मी विश्वास देतो. तुमचं मत फुकट जाणार नाही. येणाऱ्या २० तारखेला मतदान करा, ३६५ दिवस अविनाश जाधव तुमच्यासाठी उपलब्ध असेल असा विश्वास मनसे नेते अभिजित पानसे यांनी व्यक्त केला.