सहा महिन्यात उत्पन्न वाढीसाठी एकही बैठक नाही

ठाणे : गेल्या सहा महिन्यात ठाणे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्पन्न वाढीसाठी एकही बैठक झाली नसल्याची बाब समोर आली आहे. शहराचे सौंदर्यीकरण होत असताना प्रशासन उत्पन्न वाढीत मात्र स्वारस्य दाखवत नसल्याचे दिसून येत आहे.

तत्कालीन आयुक्त डॉ. विपीन शर्मा शर्मा यांची बदली झाल्यानंतर अभिजित बांगर यांना नवी मुंबईमधून ठाणे महापालिकेच्या आयुक्त पदाचा कार्यभार देण्यात आला. अभिजित बांगर यांनी आयुक्त पदाची सूत्रे सांभाळल्यानंतर सुरुवातीलाच शहरातील स्वच्छतेला प्राधान्य देण्याबरोबरच या कामात दोषी असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. त्याच सोबत त्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांना देखील प्राधान्य दिले.

मात्र उत्पन्न वाढीसाठी जेवढे प्रयत्न गेल्या सहा महिन्यांत व्हायला पाहिजे होते, तेवढे झाले नाहीत. केवळ मालमत्ता विभाग वगळता महापालिकेच्या इतर विभागांची स्थिती समाधानकारक नाही. विशेष म्हणजे आयुक्तांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे सुमारे ७००हून जास्त फाईल्सवर चर्चा न झाल्याने अधिकाऱ्यांचा खोळंबा होत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या असताना उत्पन्नवाढीसाठी या सहा महिन्यात एकही बैठक झालेली नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.