वाढत्या महागाई आणि झटपट पैशांच्या नादात करायचे चोऱ्या

ठाणे : ठाण्यातील कळवा परिसरात दुचाकीवरून येऊन चेन स्नॅचिंग करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. हीच बाब लक्षात घेऊन कळवा पोलिसांनी रात्रीच्या वेळेस गस्त वाढवली. खारीगाव येथील नवीन पुलावर अंधार असल्याने अंधाराचा फायदा घेऊन व तलवार हातात घेऊन चोरी करणाऱ्या चार आरोपींना कळवा पोलिसांनी ताब्यात घेतले.

रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना नवीन खारीगाव पुलावर तलावार हातात घेऊन फिरणाऱ्या तरूणांना पोलिसांनी पाहिले. पोलिसांनी पाठलाग करत त्यांना पकडले. चोरी करण्याच्या उद्देशाने तलवार घेऊन हे तरुण फिरायचे ही बाब कळवा पोलिसांच्या लक्षात आली. आरोपींची चौकशी केली असता कळवा तसेच मुंब्रा परिसरातील चेन स्नॅचिंगमध्ये हेच आरोपी असल्याची बाब समोर आली. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी गणपत पल्लानीस्वामी गुल्लर याच्या विरोधात या आधीही चेन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. तो इतर तीन आरोपींना सोबत घेऊन कळवा-मुंब्रा परिसरात चोऱ्या करत असे.

आरोपींकडून दोन लाख ३० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. यामध्ये विविध स्मार्ट फोन, दोन सोनसाखळ्या, एक मंगळसुत्र, एक ऑटो रिक्षा, दोन मोटार सायकल असा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास कळवा पोलिस करत आहेत.