शहरातील प्रकल्पांची, सुविधांची कामे पावसापूर्वी आटपा

पोलीस आयुक्तांनी घेतला आढावा

ठाणे : ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी ठाणे शहरातील सुरु असल्याच्या विविध कामांचा आढावा घेताना त्याबाबतच्या नियोजनावर चर्चाही केली. त्यांनी विशेषत: मान्सुनच्या दरम्यान उद्भवणा-या अडी-अडचणी दूर करण्यावर भर दिला.

ठाणे शहर पोलीस आयुक्त श्री.डुंबरे यांच्या अध्यक्षतेखाली वाहतूक सल्लागार समिती पुर्नगठीत करण्यात आली आहे. आगामी मान्सुनच्या अनुषंगाने वाहतूक नियोजनाची तयारी करण्यासाठी संबंधित सर्व शासकीय संस्थांच्या अधिका-यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीमध्ये पोलीस आयुक्तांसह आशुतोष डुंबरे, ठाणे शहर पोलीस सह-आयुक्त दत्तात्रय कराळे, ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर तसेच ठाणे महापालिकेचे शहर अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया, एमएसआरडीसी, एमएमआरडीए, प्रादेशिक परिवहन अधिकारी, मुंबई महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी, महावितरण, राज्य परिवहन महामंडळ आणि ठाणे परिवहन आदी संस्थांचे अधिकारी उपस्थित होते.

ठाणे शहरातील चालू असलेले प्रकल्प आणि पायाभूत सुविधांची कामे ही पावसाळ्याच्या अगोदर (मान्सून) नियोजित वेळेत पूर्ण होण्यासाठी तसेच नागरिकांच्या सोयीसाठी मुंबई -नाशिक महामार्ग, घोडबंदर रोड, साकेत-खारेगाव ब्रीज, घोडबंदर रोडवरील सर्व्हिस रोड तसेच महत्वाच्या जंक्शन ठिकाणी पादचा-यांच्या सुरक्षेसाठी झेब्रा क्रॉसिंग, स्टॉप लाईन आणि सायनेझ अशा विविध कामांचा आढावा गुरुवारी घेण्यात आला.

यावेळी पोलीस आयुक्त आणि ठाणे महापालिका आयुक्त यांनी वाहतूक सल्लागार समितीच्या बैठकीत सुरु असलेली काम मान्सुनपूर्व विहित वेळेतच पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.