पश्चिमेचे वारे कोमेजले; जिल्ह्याचे वातावरण तापले

ठाणे: पश्चिमी देशांतून हिमालयाकडे येणारे गार वारे सध्या कमकुवत झाल्याने उत्तर भारतासह उर्वरित देशात थंडी गायब होऊ लागली आहे. ठाणे, मुंबईतही दिवसा उष्णतेचा पारा उन्हाळ्यासारखा चढला आहे. तर यंदाचा उन्हाळा आणखी कडक होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
मागिल दोन दिवसांपासून ठाणे शहरासह जिल्ह्याचा तापमानाचा पारा ३६ अंशावर गेला आहे. दिवसा उन्हाचा तडाखा, गरम वातावरण असताना रात्री मात्र पारा १९ अंशावर खालावत आहे. त्यामुळे दिवसभर शरीराची काहीली आणि रात्री काहीशी बोचणारी थंडी असे विचित्र हवामान झाले आहे.
ग्लोबल वॉर्मिंगमुळे गेल्या काही वर्षांपासून ऋतूचक्र बिघडले आहे. प्रत्येक ऋतू एक महिना पुढे ढकलला जात असताना उन्हाळ्याने मात्र यावर्षी लवकर दरवाजा ठोठावला आहे.
यावेळी पश्चिम भागातून येणारे गार वारे जानेवारी महिन्यापासूनच कमकूवत होत चालले आहेत. त्यामुळे यावर्षी जानेवारीतही अपेक्षित थंडी पडली नाही. परिणामी जी तापमानवाढ १५ फेब्रुवारीनंतर व्हायला हवी ती यावर्षी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू झाली आहे. त्यामुळे दिवसाचे तापमान असेच चढते राहणार आहे. या आठवड्याचा मंगळवार, बुधवार हे दोन दिवस अपवाद सोडले तर पुढील सर्व दिवस अशीच उष्णता वाढत राहणार आहे. तापमान कमाल ३६ अंशाच्या पुढेच राहणार आहे. हे तापमान ३८ ते ३९ अंशापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. आपल्याकडे ३६ अंश पारा पार झाला की उन्हाळयाला सुरुवात होते. तेच वातावरण आता पहायला मिळणार असल्याचे हवामान अभ्यासकांनी सांगितले आहे.
पश्चिम विक्षोप म्हणजे मध्य पूर्व भाग, युरोप आदी पश्चिमी भागातून आपल्या देशात गार वारे घेऊन येतात. ते हिमालयाकडे सरकत असतात. तेथून थंड वारे उत्तर भारतात आणि त्यानंतर उर्वरित राज्यात पसरतात. पण यावेळी हे पश्चिमी विक्षोप कमकुवत झाले आहेत. त्यामुळे यावर्षी उत्तरप्रदेशामध्येही अपेक्षित कडाक्याची थंडी पडली नाही. परिणामी यावेळी आपल्याकडेही मुंबई, ठाणे आणि इतर परिसरात १० ते १२ अंश तापमान पोहोचले नाही.
मार्चमध्ये तापमान ४० तर एप्रिलमध्ये त्याहून जास्त म्हणजे ४२ अंशापर्यंत राहणार आहे. मे महिन्यात समुद्रीवारे दुपारी १२ वाजल्यापासून सुरू झाले तर पारा पुन्हा ३६ अंशांवर येईल. पण त्यावेळी समुद्राकडून येणारे वारे बाष्पयुक्त असतात, त्याने आद्रता वाढते आणि घाम येतो. ही परिस्थिती सध्या नसल्याने केवळ उकाडा जाणवत आहे. असे असले तरी उन्हाच्या तडाक्यापासून वाचण्यासाठी दुपारी १ ते ४ बाहेर जाणे टाळावे असा सल्ला हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी दिला आहे.
ठाणे शहराला तापमानाचा तडाखा तुलनेत कमी बसेल, पण शहापूर, मुरबाड या दोन तालुक्यांमध्ये तापमान अधिक असणार आहे. तिथे येणार्‍या आठवड्यात तापमान ४० अंशावर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.