महायुतीचा विजय पक्का, इच्छुकांचा वाढला टक्का !

ठाणे : ठाणे शहर विधानसभा मतदार संघातून महायुतीचा उमेदवार १००टक्के विजयी होणार असल्याने या मतदार संघात महायुतीमधील घटक पक्षांमधील इच्छुकांची संख्या वाढली आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांनी आत्तापासूनच फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.

मागील अनेक वर्षे ठाणे शहर मतदारसंघ युतीच्या ताब्यात आहे. विद्यमान भाजपा आमदार संजय केळकर हे या मतदार संघातून हॅट्ट्रिक मारण्याच्या तयारीत आहेत. श्री. केळकर यांचा या मतदारसंघात दांडगा संपर्क आहे. कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार असताना तसेच गेल्या दहा वर्षांत त्यांनी केलेली कामे अजोड असल्याची भावना जनतेतून व्यक्त होत आहे. त्यांची छबी देखिल मतदारांना भावणारी आहे. विशेष म्हणजे भाजपाच्या कार्यकर्त्यांना ताकद देत असताना आणि विकास कामातून संघटना मजबूत करत असताना ते अजातशत्रू म्हणून ओळखले जातात. त्यामुळे ते १०० टक्के विजयी होतील याची खात्री असून पक्षश्रेष्ठी त्यांच्यावरच पुन्हा विश्वास टाकतील, अशी खात्रीलायक माहिती आहे.

असे असले तरी या मतदारसंघातून भाजपातून माजी नगरसेवक कृष्णा पाटील, प्रदेश सचिव ॲड. संदीप लेले, सुजय पतकी हे देखिल उमेदवारी मिळावण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे कळते. शहर अध्यक्ष संजय वाघुले हे पक्षाच्या ध्येयधोरणांनुसार पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पक्षातील पदाधिकारी-कार्यकर्ते त्यांच्या संपर्कात आहेत, त्यामुळे यावेळी त्यांना लॉटरी लागू शकते असे अनेकांचे म्हणणे आहे. ॲड. संदिप लेले यांचा देखील वरिष्ठ पातळीवर संपर्क आहे, त्याची बक्षिसी त्यांना मिळेल असा होरा आहे. कृष्णा पाटील हे तळागाळातील कार्यकर्ते आहेत. त्यांच्याकडे कार्यकर्त्याची मोठी फौज आहे. आर्थिक दृष्टीने देखिल ते सबळ आहेत. जनसमुदाय देखिल त्यांच्या पाठीशी असल्याने त्यांचा देखिल यावेळी नंबर लागेल असे बोलले जात आहे. सुजय पत्की हे तरुण आहेत, वरिष्ठांच्या ते संपर्कात असतात त्यामुळे त्यांच्यावर देखिल पक्ष कृपा करू शकतो, असे बोलले जाते.
शिवसेना शिंदे गट देखिल या जागेवर दावा करत आहे. मुख्यमंत्री श्री. शिंदे ही जागा आपल्याकडे ठेवतील असा विश्वास सेनेच्या पदाधिकाऱ्यांना आहे. माजी आमदार रविंद्र फाटक हे इच्छुक आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळाली नव्हती, त्यामुळे या निवडणुकीत मुख्यमंत्री श्री. शिंदे त्यांचा विचार करतील असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. माजी महापौर अशोक वैती हे निष्ठावंत आहेत. त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. भूमिपुत्र असल्याने तसेच मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे ते खंदे समर्थक आहेत, त्यामुळे त्यांचा देखिल विचार सेनेत होईल, असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे. संजय भोईर यांचा प्रभाग या मतदारसंघात मोडतो. निम्मा मतदार त्यांच्या आठ प्रभागात आहे. त्यांची सामाजिक आणि नागरी सुविधांची कामे देखिल या भागात मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांचा जनसंपर्क देखिल दांडगा आहे. आर्थिक दृष्टीने देखिल ते मजबूत आहेत. ही जागा जर शिंदे गटाला मिळाली तर ते हमखास विजय मिळवतील, असा दावा त्यांच्या पाठीराख्यांचा आहे.
महायुतीचा विजय या मतदारसंघात निश्चित असल्याने घटक पक्षांतील इच्छुकांची गर्दी वाढत आहे. विशेष म्हणजे या गर्दीत तूर्त राष्ट्रवादी अजित पवार गट दिसत नाही. असे असले तरी आगामी निवडणुकीच्या जागा वाटपाच्या चर्चेनंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.