पीडित कामगार कुटुंब कुवैतमधून भारतात सुखरूप

भाईंदर : कुवेत येथे घरकामासाठी गेलेल्या पीडित पतिपत्नीस भारतात सुखरूप आणण्याची कामगिरी पोलिसांच्या भरोसा सेलने केली आहे. भरोसा सेल येथे सदर कुटुंबाची तक्रार प्राप्त झाल्यानंतर सहायक पोलीस निरिक्षक तेजश्री शिंदे यांनी लागलीच सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांना सदर घटनेची हकिकत सांगितली. त्यानंतर कुवैत इंडियन एम्बसीला पत्रव्यवहार करुन त्यांच्याशी संपर्क साधून पिडीत पतिपत्नीला भारतात परत आणले.

भाईंदर येथील तक्रारदार महिला ज्योती पांडे यांनी भरोसा सेल (गुन्हे शाखा) भाईंदर पश्चिम येथे तक्रारअर्ज देवून त्यामध्ये नमुद केले की, ‘त्यांच्याकडे पुर्वी घरकाम करणारी महिला, वय ४० वर्षे हि तिचे पतीसोबत घरकाम करण्यासाठी एका कंपनीच्या एजंटच्या मार्फतीने कुवैत या देशामध्ये ५ एप्रिल २०२२ रोजी गेली होती. सदर ठिकाणी कामाकरिता जातांना त्यांना कळविण्यात आले होते की, घरमालक यांचे घरामध्ये दोन लहान मुलांना सांभाळणे, घराची साफसफाई करणे व जेवण बनवण्याचे काम आहे व त्या बदल्यात त्यांना प्रत्येकी ४० हजार रूपये पगार मिळणार, असे सांगितले होते. परंतु पीडित पती-पत्नी जेव्हा कुवैत येथील घरमालक नामे मोसाब अब्दुल्ला यांचे घरी गेले तेव्हा त्यांच्या घरामध्ये नऊ लहान मुलांना सांभाळून, ५ ते ६ खोल्या व हॉलची साफसफाई करून दिवसभर जेवण बनवण्याचे काम करावे लागत होते. सकाळी ६ वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजेपर्यंत असे २२ तास त्यांना घरकाम करावे लागत होते. त्यामुळे महिलेची मानसिक व शारिरीक प्रचंड त्रासामुळे तब्येत ढासळली. तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यावेळी पिडीत महिलेने यातील अर्जदार ज्योती पांडे यांना संपर्क करून तिचे हॉस्पिटलमधील फोटो पाठवून तिला परत भारतात परत यायचे आहे परंतु त्यांचे कुवैतमधील मालक त्यांना घराबाहेर सोडत नसल्याचे व त्यांचा मोबाईल काढून घेवून त्यांना घरातच बंद करून ठेवत असल्याचे सांगितले.

ज्योती पांडे यांनी लागलीच भरोसा सेलकडे सदर घटनेच्या अनुषंगाने तक्रार केली होती. भरोसा सेल येथे सदर महिलेची तक्रार प्राप्त झाल्यानंतर सपोनि तेजश्री शिंदे यांनी लागलीच सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांना सदर घटनेची हकिकत सांगितली. त्याकरिता कुवैत इंडियन एम्बसीला पत्रव्यवहार करुन त्यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, दोन्ही पतीपत्नी यांनी काम करण्याबाबतचा करार केला असून त्या कराराअन्वये ते कुवैत येथे घरकामास लागलेले आहेत. सदर करारानुसार त्यांना त्यांच्या कामाची वेळ पुर्ण करावीच लागेल मात्र पिडीत व्यक्ती स्वतःहून इंडियन एम्बसीमध्ये आले तरच ते त्यांना मदत करू शकतील असे सांगण्यात आले. पिडीत महिलेच्या पतीचा सपोनि तेजश्री शिंदे यांचेशी संपर्क झाल्यानंतर तेजश्री शिंदे यांनी त्या दोघांनी इंडियन एम्बसीच्या ऑफिसमध्ये स्वतःहून जाण्याबाबत सांगितले. मात्र पिडीत व्यक्तींचा मालक त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये घराबाहेर निघू देत नसल्याने त्यांनी २० जून २०२२ रोजी भाजीपाला आणण्याच्या बहाण्याने घरमालकाची नजर चुकवून घराबाहेर पडले व कुवेत इंडियन एम्बसीमध्ये गेले. इंडियन एम्बसीने त्यांना त्यांच्या सेंटरमध्ये ठेवले व दोन दिवसांनी कुवैत येथील लेबर कोर्टमध्ये हजर केले. मात्र कुवैत लेबर कोर्टामध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला व त्यांचा मालक मोसाबा अब्दुल्ला याला कोर्टात हजर राहण्याचे समन्स काढण्यात आले.

मोसाबा अब्दुल्ला याने लेबर कोर्टामध्ये पती-पत्नी यांचे पासपोर्ट हजर केले. त्यावेळी लेबर कोर्टाने पिडीतांना ४ जुलै २०२२ रोजीपर्यंत स्वखर्चाने परत भारतात जाण्यास सांगितले मात्र ते जर परत जावू शकले नाही तर मालकाचा जबाब नोंद करून केस पुढे चालवण्यात येईल असे कळविले. त्यामुळे पिडीतांचे तिकिट काढण्याबाबतची व इतर तांत्रिक बाबींची पूर्तता करण्याबाबत भरोसा सेलच्या अधिकारी व अंमलदार यांनी कार्यवाही करुन दाम्पत्यास कुवैतवरून परत भारतात सुखरूप आणले.

सदर कामगिरी विजयकांत सागर, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) अमोल मांडवे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली भरोसा सेल, भाईंदर कक्षाचे सपोनि तेजश्री शिंदे, पोहवा सचिन तांबवे, मपोहवा समृध्दी भगत, मपोशि. आफ्रिन जुन्नैदी यांनी केली आहे.