ठाणे : ठाणे महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांना खासगी शाळेची अनुभूती मिळावी यासाठी विद्यार्थ्यांचा गणवेशच बदलण्याचा निर्णय वरिष्ठ स्तरावर विचाराधीन आहे. या निर्णयावर जर शिक्कामोर्तब झाले तर पालिकेच्या शाळेत येणारे विद्यार्थी नवीन वर्षात नव्या गणवेशात दिसू शकतील.
ठाणे महापालिका ६७ बालवाड्या, ११७ प्राथमिक आणि २२ माध्यमिक शाळा चालवते. या शाळांमध्ये सुमारे ३५ हजार विद्यार्थी आहेत. महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळांच्या पटसंख्येत घट होऊन पालकांचा इंग्रजी शाळांकडे ओढा वाढला आहे. यामुळे पालिकेने इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू केल्या आहेत. पालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये सीबीएसई शाळा सुरू करण्याचे प्रस्तावित केले असून त्याचबरोबर इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करण्याचेही प्रस्तावित केले आहे.
इंग्रजी शाळा सुरू करण्याबरोबरच मराठी माध्यमातील शाळांचे बळकटीकरण करण्यावर पालिकेने भर दिला आहे. शाळा इमारतींची दुरुस्ती व रंगरंगोटी करणे, बालस्नेही वर्ग तयार करणे, स्मार्ट वर्ग खोली तयार करणे, वर्गखोली डिजीटल करणे अशी कामे करण्यात येणार आहे.
ठाणे महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांचा गणवेश बदलण्याचा विचार प्रशासनाने सुरू केला आहे. या गणवेशाचा रंग कोणता असावा यासाठी पालिकेकडून चाचपणी करण्यात येत आहे. असे असले तरी पालिका शाळा सुरू होण्यासाठी दीड महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी विद्यार्थ्यांना गणवेश आणि शालेय साहित्य वेळेवर देण्याचे आदेश शिक्षण विभागाला यापूर्वीच दिले आहेत. त्यामुळे ३५ हजार विद्यार्थ्यांचे गणवेश दिड महिन्याच्या कालावधीत तयार होऊ शकतील का याचाही पालिका आढावा घेत आहे. त्यामुळे दिड महिन्यांत शक्य झाले तर यंदा गणवेशाचा रंग बदलेल आणि पुढच्यावर्षी गणवेशाचा रंग बदलेल, अशी माहिती सुत्रांनी दिली.