कुणबी मतांचे विभाजन; आगरी समाजाचे पाठबळ
ठाणे : भिवंडी लोकसभा मतदारसंघात भिवंडी पश्चिम या मतदार संघातील अल्पसंख्यांक मतदारांनी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांना तारले. त्यामुळेच त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचा 66,121 मतांनी पराभव केला. त्यांना चार लाख ९९ हजार मते मिळाली.
भिवंडी पूर्व आणि पश्चिम या दोन विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर अल्पसंख्याक मतदार आहेत. त्यांनी एकगठ्ठा मतदान राष्ट्रवादीचे बाळ्या मामा यांना केले. या मतदारसंघातून अनुक्रमे एक लाख आठ हजार ११३, आणि एक लाख आठ हजार ३५८ इतकी मते बाळ्या मामा यांना पडली. कपिल पाटील यांना ४५,३७३ आणि ४७,८७८ इतकी मते मिळाली. २०१९ साली काँग्रेसचे सुरेश टावरे यांना ७०,८२५ आणि भिवंडी पश्चिममधून ७८,३७६ इतकी मते मिळाली होती तर कपिल पाटील यांना अनुक्रमे ४५,३७२ आणि पश्चिम येथून ५२,८५६ इतकी मते मिळाली होती. या निवडणुकीत बाळ्या मामा यांच्या मतांमध्ये या दोन मतदारसंघात मागील निवडणुकीच्या तुलनेत प्रत्येकी तीस हजारपेक्षा जास्त मते पडली, मात्र कपिल पाटील यांच्या मतामध्ये मात्र फारसा फरक पडला नाही. उलट भिवंडी पश्चिम मतदारसंघात त्यांची मते मागील वर्षापेक्षा कमी झाली आहेत. शहापूर विधानसभा क्षेत्रात जिजाऊचे उमेदवार निलेश सांबरे हे प्रथम क्रमांकावर राहिले असून त्यांनी शहापुरात ७४,६८९ मते घेतली आहेत. त्यामुळे शहापूर मतदारसंघात जिजाऊचा करिष्मा चालला आहे.
शहापूर तालुक्यात एकूण एक लाख ९७,११९ मतदान झाले. यात जिजाऊचे अध्यक्ष निलेश सांबरे यांना 74,689 मते मिळाली तर विजयी उमेदवार बाळ्या मामा म्हात्रे यांना 54,701 मते मिळाली. माजी खासदार कपिल पाटील यांना 43,529 मध्ये मिळाली. शहापूर विधानसभा क्षेत्रातील 327 बुथमध्ये हे मतदान झाले असून यात शहापूर तालुक्यासह वाडा तालुक्यातील जिल्हा परिषद गटांचा समावेश आहे.
निलेश सांबरे शहापुरात अव्वल राहिले त्यांनी बाळ्या मामा म्हात्रे यांच्यापेक्षा 19,988 मते अधिकची घेतली तर कपिल पाटील यांच्यापेक्षा 31,168 मते जास्त घेतली.
मुरबाड विधानसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत श्री. पाटील यांना एक लाख २५ हजार मते मिळाली होती. यावेळी मात्र या मतांचे विभाजन होऊन श्री.पाटील यांना एक लाख ६३६९, श्री.म्हात्रे यांना ७७,५६८ आणि अपक्ष उमेदवार श्री.सांबरे यांना ६४,७१३ मते मिळाली आहेत. मागील निवडणुकीत काँग्रेसचे सुरेश टावरे यांना ६०,८९६ मते मिळाली होती.
या तीन मतदारसंघात सर्वाधिक फटका केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना बसला आहे. शरद पवार, अरविंद केजरीवाल आणि आ.डॉ जितेंद्र आव्हाड यांनी बाळ्या मामा यांच्याकरिता घेतलेली मेहनत कामी आली आहे. आ.आव्हाड यांची मुंब्रा विधानसभा मतदार संघातील अल्पसंख्याक समाजात असलेली लोकप्रियता देखिल बाळ्या मामाच्या विजयाला कारण ठरली आहे.
आगरी समाज हा यावेळी बाळ्या मामाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आणि कुणबी समाजाच्या मताचे झालेले विभाजन हे बाळ्या मामाच्या पथ्यावर पडले. अशा अनुकूल परिस्थितीमुळेच ठाणे जिल्ह्यात पहिल्यांदाच राष्ट्रवादीची तुतारी वाजली आहे.