पाठलाग करून चोरट्याला दिला चोप; ऐवज हस्तगत

शाखा प्रमुखाच्या कामगिरीचे कौतुक

ठाणे : पहाटे चोरी व घरफोडी करुन आलेल्या चोराला ढोकाळी शिवसेना शाखेचे शाखाप्रमुख चेतन चौधरी यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून शिताफिने पकडले. त्याला कापूरबावडी पोलिसांच्या हवाली केल्यानंतर त्याच्याकडून लाखो रुपयांचा चोरीचा ऐवज हस्तगत करण्यात आला. ही घटना सोमवार २३ रोजी घडली. शाखाप्रमुखाच्या या धाडसी कामगिरीचे पक्षातून आणि शहरातील विविध स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

ढोकाळी येथील शिवसेना शाखाप्रमुख चेतन चौधरी हे सोमवारी पहाटे झोपेत असताना चोरट्याने त्यांच्या घरात खिडकीवाटे प्रवेश केला. मात्र घरातील महिलेचा आरडा-ओरडा ऐकून चोरट्याने पुन्हा खिडकीतून पलायन केले. शाखाप्रमुख चेतन चौधरी यांनी प्रसंगावधान राखत त्या चोराचा पाठलाग केला. त्यांनी फिनिक्स रुग्णालयाशेजारी असलेल्या दिव्यलक्ष्मी सोसायटीजवळ त्या चोराला गाठले आणि पकडले. त्याची झडती घेतली असता दोन मोबाईल, इअर पॉड, सोन्याचे दागिने आणि काही रक्कम त्याच्याकडे आढळली. त्यानंतर नागरिकांनी चोरट्याला चोप देत कापूर बावडी पोलिसांच्या ताब्यात दिले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, उपशहर प्रमुख वासुदेव भोईर, उपशहर प्रमुख चंद्रकांत नार्वेकर, बाळकूमचे शाखाप्रमुख संतोष भोईर, शांताराम आगरे, युवक काँग्रेस ठाणे शहर उपाध्यक्ष स्वप्नील भोईर, ठाणे शहर युवक काँग्रेस विधानसभा उपाध्यक्ष यज्ञेश वाडेकर, माजी सैनिक आणि ठाणे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे कोषाध्यक्ष जयदीप भोईर आदींनी चेतन चौधरी यांचे एका कार्यक्रमात कौतुक केले.