ठाण्याच्या सहयोग मंदिरात उलगडली धर्मवीरांची गोष्ट

ठाणे : सहयोग मंदिरात धर्मवीर 2 या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे, निर्माता मंगेश देसाई आणि अभिनेते क्षितिज दाते यांनी धर्मवीर दोन ची गोष्ट उलगडली.

अभिनेते, निवेदक विघ्नेश जोशी यांनी विचारलेल्या प्रश्नांना सगळ्यांनी मनमुराद उत्तरं दिली. सिनेमाची कथा कशी सुचली ते या सिनेमाच्या मागे आणि पडद्यावर काम करणाऱ्या सगळ्यां कलाकारांचं भरभरून कौतुक केलं. आपल्या प्रत्येक सिनेमाची भाषा आपण कशी निवडता याबद्दल प्रवीण तरडे म्हणाले की ज्या मातीतला सिनेमा करायचा त्या मातीची भाषा तुमच्या चित्रपटात असेल तर तो चित्रपट सुपर डुपर हिट होतोच.

धर्मवीर दोनबद्दल बोलताना प्रवीण तरडे म्हणाले की या चित्रपटांमध्ये प्रसाद ओक यांचं जे कॅरेक्टर आहे त्यासाठी स्वतः प्रसाद ओक यांनी खूप मेहनत घेतली. धर्मवीर आनंद दिघे साहेबांची एक प्रकारची लकब उचलण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले आहेत. त्याचप्रमाणे क्षितिज दाते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील खूप अभ्यास केला आहे. यातली सगळीच कॅरेक्टर्स आपल्याला आपल्या जवळची वाटतात कारण धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी सोप्या शब्दांमध्ये इतकं काही सांगितलं आहे की त्या सगळ्या कॅरेक्टर्सना डिरेक्ट करत असताना मला त्यांच्याबद्दलचा एकेक शब्द आठवत होता आणि म्हणूनच मी हे काम उत्तम पद्धतीने करू शकलो. खरंतर धर्मवीर एकमध्ये अडीच तासांमध्ये संपणारी गोष्ट नाही करण साहेबांचा प्रत्येक दिवस म्हणजे प्रत्येक गोष्ट आणि त्याच्यावर सिनेमा होऊ शकतो हे मला कळून चुकलं धर्मवीर दोन मध्ये आम्ही त्यांच्या प्रखर हिंदुत्वाची साक्ष देणारी कथा उलगडून सांगितली आहे, त्यामुळे येत्या 27 तारखेला हा सिनेमा आपण सगळ्यांनी जरूर पहावा, असा आवाहन देखील त्यांनी केले. अपूर्वा प्रोडक्शन्स आणि वेध थिएटर आयोजित हा कालचा कार्यक्रम खूप रंगला जेव्हा वेध अकॅडमीच्या मुलांनी अनेक प्रश्न निर्माते दिग्दर्शक तसंच कलाकारांना विचारले. लहान मुलांची असणारी चुणूक आणि सिनेमाबद्दलचा असणारे प्रेम यांनी प्रवीण तरडे आणि क्षितिज दाते तसेच निर्माते मंगेश देसाई दिग्मुढ झाले. चित्रपटाआधीच इतका प्रतिसाद तर चित्रपट आल्यावर हाउसफुल ची पाटी घेऊनच झळकणार आहे अशी प्रतिक्रिया अपूर्वा प्रोडक्शनचे सुमुख वर्तक ह्यांनी मांडली. सुमुख वर्तक यांच्या आयोजनामुळे कालचा कार्यक्रम अतिशय दिमाखदार पद्धतीने साजरा झाला.