तोतया पोलिसांनी ज्येष्ठ महिलेचे साडेचार लाखांचे दागिने लुटले

एकट्याने प्रवास करताय? सावधगिरी बाळगा!

ठाणे : एकट्या-दुकट्या वृद्धांना लुटण्याच्या घटना वाढत असल्यामुळे त्यांनी कायम सावधगिरी बाळगावी, असा सल्ला ठाणे पोलीस यंत्रणा देत असतानाच, तोतया पोलिसांनी एका वरिष्ठ नागरीक असलेल्या महिलेचे साडेचार लाख रुपयांचे दागिने लुबाडून पोबारा केला. या धक्कादायक घटनेमुळे ती अद्याप दडपणाखाली आहे.

संबंधित महिला रिक्षेतून जात असताना दोघेजण त्यांच्या वाहनाने मागावर होते. मोक्याच्या ठिकाणी संधी साधून रिक्षा थांबवण्यात आली आणि ते स्वत:ला पोलीस संबोधित होते. वृद्ध महिलेला विश्वास वाटावा याकरीता त्यांनी स्वत:ची बनावट ओळखपत्रेही दाखवली आणि रिक्षाचालकाकडे गाडीची कागदपत्रे तपासण्याचा बहाणा केला. त्यामुळे रिक्षाचालकाचाही विश्वास बसला. ‘या परिसरात चोरांची वर्दळ असल्याचे सांगून महिलेला आणि चालकालाही घाबरवले. तुम्ही येथे दागिने घालू नका, असे सांगून त्यांच्याकडे  असलेले दागिने काढून घेतले आणि खरे दागिने काढून घेत ते पेपरात बांधले आणि खोटे दागिने देऊन ते फरार झाले आहेत, अशी माहिती कापुरबावडी पोलिसांंनी दिली.

कापुरबावडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संतोष पिंपळे या घटनेचा कसून तपास करत आहेत.  गेल्या शनिवारी सकाळी ११. २० वाजता ही घटना रुस्तमजी येथे झाली आहे. संबंधित महिलेला पोलिसांनी विचारणा  केली असता त्या भांबावलेल्या दिसल्या, असे त्यांनी ‘ठाणेवैभव’ला सांगितले. या महिलेला लुटणा-यांना गुप्त बातमीदार आणि आमच्या संपर्कातील व्यक्तींच्या मदतीने नक्कीच शोधून काढू तसेच अन्य मार्गांंनी ही घटना उघडकीस आणूच, असे त्यांनी सांगितले.

वयोवृद्धांनी, नागरिकांनी कायम सावध आणि सतर्क राहणे महत्वाचे आहे. अनोळखी व्यक्तींच्या संपर्कात येऊ नका, त्यांच्या भूलथापांना-गोड बोलण्याला बळी पडू नका, असे कळकळीचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पिंपळे यांनी केले आहे.

तपासासाठी फारसे धागेदोरे नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. मात्र तोतया पोलीस कल्याणच्या दिशेकडून आले होते, अशी माहिती कापूरबावडी पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार, पोलीस सीसीटीव्हीचे फुटेज आदी मार्गांनी तपास करत असून आरोपींना नक्कीच पकडू असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.