प्रवासात गहाळ झालेली पर्स पोलिसांनी केली परत

ठाणे : महत्त्वाची कागदपत्रे असलेली पर्स दुचाकीवरून पडल्यानंतर वाहतूक पोलिसांनी ती ताब्यात घेत संबंधित महिला दुचाकीस्वाराच्या स्वाधीन केली. पर्स मिळाल्याने महिलेला हायसे वाटून तिने पोलिसांचे आभार मानले.

‘ठाणेवैभव’च्या कर्मचारी प्रियांका सकपाळ या गुरुवार १४ मार्च रोजी सायंकाळी साडे सात च्या दरम्यान चरई येथील कार्यालयातून कोलशेत येथील घरी दुचाकीने निघाल्या होत्या. माजिवडे पुलाखालून पुढे निघाल्यानंतर त्यांची दुचाकीवर ठेवलेली पर्स अनवधानाने रस्त्यात पडली. या पर्समध्ये आधारकार्ड, पॅनकार्ड, बँकेची कागदपत्रे, मोबाईल आदी मौल्यवान वस्तू होत्या. पुढे गेल्यानंतर ही बाब त्यांच्या लक्षात आली.

दरम्यान ही पर्स सापडल्यानंतर कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस लक्ष्मण तायडे यांनी ती ताब्यात घेतली. पर्समधील कागदपत्रे तपासली असता त्यांना मंदार सकपाळ यांचा मोबाईल नंबर मिळून आला. त्यावर त्यांनी पर्स सापडल्याची माहिती दिली.

त्याचवेळी प्रियांका सकपाळ या पर्स शोधत घटनास्थळी आल्या आणि शोध सुरू केला. त्यावेळी उपस्थित तावडे यांनी पर्स सापडल्याचे त्यांना सांगितले. तसेच ओळख पटवून पर्स सकपाळ यांच्या ताब्यात दिली. पर्स मिळाल्याने सकपाळ यांना हायसे वाटले. पोलिसांच्या दक्षतेबद्दल त्यांनी वाहतूक पोलीस लक्ष्मण तायडे, किरण कुंभार, शशिकांत हुलवान तसेच ट्रॅफिक वॉर्डन श्री.तुरेराव, श्री.राणे यांचे आभारही मानले.