प्लास्टर पडले, जळमटे चढली; कोट्यवधींच्या कलाभवनची रया गेली

ठाणे: ठाणेकरांची सांस्कृतिक भूक भागवणारे ठाणे महापालिकेचे ‘कलाभवन’ गेली सहा वर्षे दुरुस्तीच्या अभावी बंद असल्याचे उघड झाले आहे. एकीकडे अन्य वास्तूंच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत असताना कलाभवनच्या दुरुस्तीचा प्रस्ताव देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

बाळासाहेब ठाकरे स्मारक, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्याही आधी कापूरबावडी भागात महापालिकेने कलाभवनची निर्मिती केली होती. हेच कलाभवन सुरुवातीला ठाणेकरांचे आकर्षणाचे बिंदू होते. या ठिकाणी अनेक नामवंत कलाकारांच्या कलेचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या तीन मजली कलाभवनात अनेक कार्यक्रमांचे आयोजन देखील आतापर्यंत करण्यात आले आहे. मात्र दुरुस्तीच्या अभावी कोव्हीड काळापासून हे कलाभवन दुरुस्त न झाल्याने बंद आहे.

कलाभवनाच्या तळ मजल्यावर प्लास्टर कोसळले असून प्लास्टरची माती देखील हटवण्यात आलेली नाही. दुसऱ्या मजल्याची परिस्थिती देखील तशीच आहे. बाहेरच्या नावाच्या बोर्डाची देखील अतिशय खराब अवस्था आहे.

दुरुस्तीअभावी कोट्यवधींचे कलाभवन मातीमोल होऊ नये, यासाठी तयार करण्यात आलेला दुरुस्तीचा प्रस्ताव देखील दुर्लक्षित असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.