ठाण्याचा टक्का वाढलाच नाही! तिन्ही मतदारसंघ पन्नाशीखाली!!

ठाणे: पक्षफुटी आणि सत्ताकांक्षा आणि मोठ्या प्रमाणात मतदारांमध्ये जनजागृती यामुळे यंदा मतदानाचा टक्का वाढणार असा छातीठोक अंदाज व्यक्त होत असताना ठाणे जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात हे अंदाज फोल ठरले. ठाणे, भिवंडी आणि कल्याण मतदारसंघात २०१९ पेक्षा कमी मतदान झाल्याचे अधिकृत सूत्रांकडून कळते.

राज्यातील पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान आज सोमवारी १३ जागांवर पार पडले. यात मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघांचा समावेश होता. मागील अडीच वर्षांत झालेल्या राजकीय घडामोडी, आणि सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केलेली निवडणूक यामुळे यंदा मतदानाची टक्केवारी वाढेल, असा विश्वास व्यक्त होत होता. मात्र राज्यात हा टक्का जेमतेम ४९ पर्यंत गेला. तर अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या ठाणे जिल्ह्यातील मतदानही ५० टक्क्यांच्या खालीच झाले.

२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाणे मतदारसंघात ५० टक्के, कल्याण मतदारसंघात ४४.२७ टक्के तर भिवंडी मतदारसंघात ५३ टक्के मतदान झाले होते. यंदा हे मतदान किमान ५५ ते ६० टक्क्यांपर्यंत जाईल, असा विश्वास व्यक्त होत होता. मात्र सोमवारी सायंकाळी मिळालेल्या माहितीनुसार ठाणे मतदारसंघात ४८.०४ टक्के, कल्याण मतदारसंघात ४३.४ टक्के तर भिवंडी मतदारसंघात ४९.४३टक्के मतदान झाले.

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भिवंडी पूर्व विधानसभा मतदार संघात ४६.७०टक्के, भिवंडी ग्रामीण-५८ टक्के, भिवंडी पश्चिम-४७.८० टक्के, कल्याण पश्चिम-४३ टक्के, मुरबाड-५१.१८ टक्के आणि शहापूर मतदारसंघात ५०.९९टक्के मतदान झाले.

कल्याण लोकसभा मतदारसंघातील अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात ४०.०१ टक्के, डोंबिवली-४२.५१टक्के, कल्याण पूर्व-४२.५८ टक्के, कल्याण ग्रामीण-४२.७३ टक्के, मुंब्रा कळवा-४६.६० टक्के आणि उल्हासनगर मतदारसंघात ४२.६८ टक्के मतदान झाले.

ठाणे लोकसभा मतदारसंघातील ऐरोली विधानसभा मतदारसंघात ४७ टक्के, बेलापूर-५०.१२ टक्के, कोपरी पाचपाखाडी-५१.०७ टक्के, मीरा भाईंदर-४५.२५ टक्के, ओवळा माजिवडे-४९.३४ टक्के आणि ठाणे विधानसभा मतदारसंघात ४५.९९ टक्के मतदान झाले.

ठाणे लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे नरेश म्हस्के तर महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे राजन विचारे रिंगणात आहेत. कल्याण मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि विद्यमान खासदार डॉ.श्रीकांत शिंदे महायुतीकडून तर ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर रिंगणात आहेत. या दोन्ही मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होत आहे तर भिवंडी मतदारसंघात भाजपाचे विद्यमान खासदार कपिल पाटील विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे अशी लढत होत आहे.

हे कमी झालेले मतदान कुणाच्या पथ्यावर पडणार हे ४ जूनलाच कळणार आहे. ठाणे लोकसभेची मतमोजणी घोडबंदर रोड कासारवडवली येथील न्यू होरायझन हायस्कूल येथे होणार आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी केयूडी बिजनेस क्लस्टर पार्क येथे होणार आहे तर कल्याण लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी डोंबिवली पूर्व येथील संत सावळाराम महाराज क्रीडा संकुल येथे होणार आहे.