ठाण्यातील खोपट एसटी आगाराचे पॅटर्न राज्यभर राबवणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

ठाणे: राज्य परिवहन सेवेचे राज्यातील सर्व आगार विमानतळाप्रमाणे तयार करण्यात येणार असून प्रत्येक आगारात कॅशलेस रुग्णालय आणि पंचतारांकित सुविधा उपलब्ध करून देणार आहोत. खोपट आगराचा पॅटर्न राज्यभरातील सर्व आगारात राबवण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
खोपट बसस्थानकावरील नुतनीकरण करण्यात आलेल्या वातानुकूलित चालक-वाहक विश्रांती गृहाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते.
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना एका कार्यक्रमादरम्यान त्यांची नजर खोपट एसटी आगाराकडे
गेली. कार्यक्रम आटोपताच त्यांनी आगाराच्या इमारतीला भेट देत तेथील दुरावस्था पाहिली. त्यावेळी वाहक आणि चालकांच्या विश्रांतीगृहाची दुरावस्था झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्याच क्षणी त्यांनी नूतनिकरण करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही मध्यंतरी आगाराला भेट देत नुतनीकरणाचे काम योग्यरितीने सुरू आहे की नाही त्याची झाडाझडती घेतली. त्यावेळीही इमारतीची डागडुजी केली पण अंतर्गत सुविधांचा अभाव त्यांचाही लक्षात आला. त्यांनी नाराजी व्यक्त करत तत्काळ सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. त्यानुसार आता खोपट एसटी आगाराचा कायापालट झाला आहे. निर्देशानुसार एसटीच्या वाहक आणि चालकांसाठी वातानुकूलित विश्रांतीगृह, गरम पाण्याची सुविधा आदी अद्ययावत सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. त्याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.
हा खोपट आगाराचा पॅटर्न संपूर्ण राज्यभरात राबवण्यात येणार आहे, अशी माहितीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. लालपरी ही राज्याची जीवनवाहिनी आहे. आता एसटीचा पूर्ण चेहरामोहरा बदलणार आहोत, असे शिंदे यांनी सांगतानाच राज्यातील सर्व एसटीचे आगार विमानतळाप्रमाणे तयार करण्यात येणार आहेत, अशी घोषणाही श्री शिंदे यांनी केली. सर्व एसटी आगारामध्ये कॅशलेस रुग्णालय तयार करण्यात येणार आहेत. परिवहनसेवा पंचतारांकित होणार आहे, असे श्री.शिंदे यांनी सांगितले.