दिवाळीतील सुका कचरा पालिका संकलित करणार

ठामपा राबवणार पुनर्निर्माण अभियान

ठाणे: दिवाळीमध्ये निर्माण होणारा अतिरिक्त सुका कचरा संकलित करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. यासाठी महापालिकेकडून पुनर्निर्माण अभियान राबवण्यात येणार असून सामाजिक संस्थांच्या माध्यमातून कचऱ्याचे संकलन करण्यात येणार आहे.

दिवाळीमध्ये नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या भेटवस्तू आणि इतर प्रकारची खरेदी होत असते. त्यामुळे इतर दिवशी निर्माण होणाऱ्या कचऱ्यासोबतच दिवाळी सणाच्या काळातही अतिरिक्त सुका कचरा निर्माण होतो. हा निर्माण झालेला कचरा नागरिक फेकून देत असल्याने शहर अस्वच्छ होत असते. यावर प्रभावी उपाय म्हणून ठाणे महापालिकेच्या वतीने पुनर्निर्माण अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली आहे. हा कचरा संकलन करण्यासाठी ठिकठिकाणी संकलन केंद्रे निर्माण करण्यात आली असून या केंद्रांवर हा सुका कचरा जमा करून शहर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन पालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.

कचरा संकलनासाठी समर्थ भारत व्यासपीठ, स्त्री मुक्ती संघटना आणि अँटी प्लास्टिक ब्रिगेड या स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य मिळाले असल्याचे उपायुक्त मनीष जोशी यांनी सांगितले. प्रत्येक स्वयंसेवी संस्थेला ठाणे शहरातील विविध भागातून कचरा संकलन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. संपूर्ण शहरातील सुका कचरा हा विवियाना मॉलच्या समोरील उड्डाणपुलाच्या खाली जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर या कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया केली जाणार असल्याचे पालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.