ठाणे : मोफत टोल आणि वाहतूक पोलिसांसमोर फुशारकी मारून चमकोगिरी करण्यासाठी ठाणे महापालिकेचे मानचिन्ह बेकायदेशीरपणे सर्रास वापरले जात असून अशा चमकोगिरी करणाऱ्यांच्या विरोधात महापालिका कधी कारवाई करणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.
ठाणे महापालिकेचा लोगो वापरण्यास बंदी आहे. महापालिकेचे प्रतिनिधी महापालिकेचा लोगो वापरत होते. त्यांना देखील मनाई करण्यात आली होती ल. काही वर्षांपूर्वी अशा प्रकारचे महापालिका लोगो वापरणाऱ्यांच्या विरोधात महापालिकेच्या जाहिरात विभागाने फौजदारी गुन्हे दाखल केले होते. हे लोगो तयार करणाऱ्या साईन बोर्डवाल्यांच्या विरोधात देखील गुन्हे दाखल केले होते. त्यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर ही मोहीम थंडावली होती. परंतु आत्ता मात्र गाडीवर लोगो लावून मिरवण्याची चढाओढ लागली आहे.
माजी नगरसेवक लोगो वापरत होते, मात्र आता दोन वर्षांपूर्वीच महापालिका बरखास्त झाली आहे तरी देखील लोगो लावणे बंद झाले नाही. कोणीही लोगो वापरून मुलुंड टोल नाका येथे नगरसेवक असल्याचे सांगून टोलमध्ये सूट मिळवत आहे तसेच वाहतूक पोलिसांसमोर फुशारकी देखील मारली जात आहे.
महापालिकेचा लोगो गाडीवर लावून अनेक जण चमकोगिरी करत आहेत. त्यांच्या विरोधात सरकारी कागदपत्रे विना परवानगी वापरल्याचा फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत आहे. या गाड्या महापालिकेचा लोगो लावून लेडीज बियर बार, दारूचे दुकान आणि जुगार अड्डयावर देखील उभ्या असतात, त्यामुळे महापालिकेची बदनामी होत असल्याने लोगो वापरणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.