मनपा सफाई कामगारांच्या मागण्यांकडे महापालिकेची पाठ

नवी मुंबई : स्वच्छ भारत अभियानात नवी मुंबई महानगर पालिकेची मान उंचावणारे सफाई कामगार समान काम-समान वेतन मिळावे म्हणून २८ डिसेंबरपासून उपोषणाला बसले आहेत. मात्र उपोषणाला पाच दिवस झाले तरी मनपा प्रशासनाने उपोषणाची दखल न घेता कामगारांच्या मागण्यांकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे या सफाई कामगारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेत कार्यरत कामगारांना समान काम समान वेतन मिळावे, ही कामगारांची मागणी आहे. ह्या मागणीसाठी वारंवार आंदोलने, मोर्चे काढण्यात येत आहेत. याबाबत नगर विकास खात्याने देखील अधिनियमातील तरतुदी आणि नियमानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश सप्टेंबर २०२४ ला दिले आहेत. त्यानुसार समान काम समान वेतन धोरण ठरविण्यासाठी मनपा आयुक्तांनी समिती स्थापन करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. समितीच्या अहवालानुसार समान काम समान वेतन धोरणानुसार वेतन दिल्यास कामगारांचे वेतन कमी होईल असा निष्कर्ष काढला आहे.

याचा निषेध नोंदविण्यासाठी आणि कामगारांच्या मागणीप्रमाणे २००७ साली नियुक्त कायम कर्मचाऱ्यास आज रोजी मिळणारे वेतन सर्व विभागातील कामगारांना मिळावे .या मागणीसाठी प्रथमतः शुक्रवार २७ डिसेंबर रोजी समता समाज संघटनेमार्फत मनपावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चा काढून देखील मनपाने दखल न घेतल्याने कामगारांनी अखेर शनिवार २८ डिसेंबरपासून आमरण उपोषण पुकारले आहे. मात्र १ जानेवारी उजाडले तरी देखील या कामगारांची मनपाने दखल घेतली नसल्याने कामगारांनी नाराजी व्यक्त केली आहे, अशी माहिती संघटनेचे सरचिटणीस मंगेश लाड यांनी दिली.