भाईंदर: नालासोपारा येथील ज्वेलर्सच्या दुकानात पाच जणांच्या टोळीने दरोडा टाकला होता. यात त्यांनी चाळीस लाखांचे दागिने लंपास केले होते. यातील आरोपीला तब्बल 17 वर्षानंतर अटक करण्यात आली आहे.
कुठल्याही आरोपीची कायद्याच्या चौकटीतून सुटका नसते. आरोपीने केलेल्या कृत्याचे पितळ कधी ना कधी उघड होतच असतं. अशाच एका गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांनी यश आले आहे. मात्र, या गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यास पोलिसांना तब्बल 17 वर्षे लागली आहेत. ही घटना आहे मीरा रोड आणि नालासोपारा इथल्या ज्वेलर्सच्या दुकानातील चोरीची. 17 वर्षापूर्वी नालासोपारा येथील ज्वेलर्सच्या दुकानात जाऊन पाच जणांच्या टोळीने चॉपरचा धाक दाखवून दरोडा टाकला होता. यात त्यांनी तब्बल चाळीस लाखांचे दागिने लंपास केले होते. त्यानंतर यातील आरोपीने तब्बल 17 वर्ष पोलिसांना गुंगारा देत पळ काढला होता. अखेर पोलिसांनी यातील मुख्य आरोपीला हिंगोली येथील भांडेगाव येथून अटक केली आहे.
जॉनी उर्फ जनार्दन वाघमारे असे या संशयित आरोपीचे नाव आहे. याला पोलिसानी हिंगोली येथील भांडेगाव येथून अटक केली आहे. जॉनी उर्फ जनार्दन वाघमारे हा 13 गुन्ह्यांतील आरोपी होता. परिणामी तो मागील 17 वर्षांपासून फरार होता. त्याने मीरा रोड आणि नालासोपारा येथील ज्वेलर्समध्ये दरोडा टाकत त्यात त्याने चाळीस लाख दहा हजारांचे सोने लंपास केले होते.
मुकेश जैन यांच्या नालासोपारा येथील ज्वेलर्सचा दुकानात जाऊन पाच जणानी मुकेश जैन यांना धमकावून त्यांचे हात-पाय बांधले. त्यानंतर त्यांना खोलीत कोंडून ठेवले आणि दुकानातील सोने लुटून घेऊन गेले.
घटना घडल्यानंतर याबाबत मुकेश यांनी नालासोपारा पोलीस स्टेशनला तक्रार दिली असता नालासोपारा पोलिसानी चार आरोपीना अटक केली होती. वसंत म्हात्रे, बायनबाई वाघमारे, कुसुम कोरडे, इंदुबाई लोबणे, दिपक रोडा अशी या चौघांची नावे असून यांना पकडण्यात नालासोपारा पोलिसांना यापूर्वीच यश आले होते. मात्र या प्रकरणातील मुख्य सूत्रधार जॉनी उर्फ जनार्दन हा मागील 17 वर्षांपासून फरार होता. अखेर आज त्याला नालासोपारा पोलिसांच्या गुन्हे प्रगटीकरण शाखेने जेरबंद करत त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.