मुमरी धरणबाधित शेतकऱ्याच्या मोबदल्यावर टांगती तलवार

भिवंडी प्रांत कार्यालयासमोर कुटुंबासह आत्मदहन करण्याचा इशारा

ठाणे: शहापूर तालुक्यातील शेतकरी सुरेश वेहळे यांची मौजे कोठारे येथील जमीन मुमरी धरण प्रकल्पात बाधित झाली असून त्याचा मोबदला गैर अर्जदारांना अदा केल्यास भिवंडी प्रांत कार्यालयासमोर कुटुंबासह आत्मदहन करण्याचा इशारा लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

तालुक्यातील कोठारे येथील मिळकत स.नं. 170/0, 118/0, 119/1/3, 119/4, 121/0, 124/4/ब, 119/1/ब या मिळकती फेरफार क्रमांक 1566 बाबत अतिरीक्त विभागीय आयुक्त कोकण विभाग यांनी त्यांचेकडील 18 मार्च 2024 च्या आदेशाचे म.ज.म.अ.1966 चे कलम 85 नुसार कार्यवाही करून योग्य ते आदेश पारीत करावेत असे निर्देश दिले असतांना भूसंपादनाचा मोबदला दिला जात असल्याच्या विरोधात
शेतकरी सुरेश वेहळे यांनी भिवंडी प्रांत कार्यालयात कुटुंबासह आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

या आदेशाविरुध्द गैरअर्जदार बेबीबाई मारूती खंडवी यांनी प्रधान सचिव तथा विशेष कार्यअधिकारी (अ.व.रि.) महसुल यांचेकडे फेरतपासणी अर्ज केला होता. त्या अनुषंगाने विभागीय आयुक्त कोकण विभाग यांचे आदेश क्रमांक अपिल/डेस्क/आरटीएस/रिव्ही/186/2023 18 मार्च 2024 रोजीच्या आदेशाच्या अंमलबजावणीस स्थगिती 18 डिसेंबर 2024 रोजी आयोजित पुढील सुनावणीपर्यंत वाढविण्यात येत आहे, असे अंतरीम आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार सदर मिळकतीबाबत विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांनी अप्पर जिल्हाधिकारी ठाणे यांना कार्यवाही करून योग्य ते आदेश पारीत करावेत असे निर्देश दिलेले असून त्या अनुषंगाने कार्यवाही होणे अपेक्षित आहे. परंतु हे आदेश डावलून सदर मिळकतीचा भुसंपादन मोबदला बेबीबाई खंडवी व अनिबाई फसाळे यांना अदा केला जात असल्याने शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते. तथापी मी आदिवासी असल्याने माझ्यावर अन्याय होत असल्याचा आरोप सुरेश वेहळे यांनी भिवंडी उप विभागीय अधिकारी तथा भुसंपादन अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. मी निवेदन दिल्यानंतर प्रांत अधिकारी अमित सानप यांनी मला व माझ्या मुलींना संपूर्ण दिवस कार्यालयाबाहेर बसून ठेवले व संध्याकाळी कोणतेही लेखी उत्तर न देता परत पाठविण्यात आले. सानप हे जाणीवपूर्वक माझी छळवणूक करत असल्याचे सुरेश वेहळे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. दरम्यान प्रांत अधिकारी अमित सानप यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

हे प्रकरण अप्पर जिल्हाधिकारी, ठाणे यांचेकडे पाठविले आहे. त्यांना आदेश पारीत करण्याचे निर्देश कोकण आयुक्त यांनी दिले आहेत. सदर आदेश वाटपाचे आहेत. म.ज.म.अ. 1966 चे कलम 85 नुसार ते आदेश होईपर्यंत भुसंपादनाचा मोबदला अदा करून नये. अन्यथा मी माझ्या पत्नी व माझ्या दोन मुलींसोबत भिवंडी प्रांत कार्यालयात आत्मदहन करणार असून यास सर्वस्वी भुसंपादन अधिकारी अमित सानप जबाबदार असतील, असे सुरेश वेहळे यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांचा मोगलाई आदेश

यापूर्वी भूसंपादन झालेल्या व रजिस्टर होऊन मिळालेला मोबदला जमा करण्याची सूचना उपविभागीय अधिकारी अमित सानप यांनी शेतकरी सुरेश वेहळे यांना दिल्याने शेतकरी मानसिकदृष्ट्या खचला आहे. रजिस्टर होऊन मोबदला मिळाल्यानंतर सदर मोबदला परत करण्याचे तोंडी आदेश श्री. सानप हे शासनाच्या कोणत्या आदेशाने देतात आणि तसे असेल तर तोंडी आदेश देणारे अमित सानप यांनी यापूर्वी झालेला शासकीय रजिस्टर रद्द करावा, असे शेतकरी सुरेश वेहळे यांचे म्हणणे आहे.