पहिली भूमिगत मेट्रो २४ जुलैपासून धावणार

मुंबई : मुंबईची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उत्तम उपाय म्हणून मुंबईच्या पहिल्या भूमिगत मेट्रोची सर्वचजण आतुरतेने वाट पाहत आहेत. आता यासंदर्भात मोठी अपडेट समोर येत असून मुंबईची पहिली भूमिगत मेट्रो (ॲक्वा लाईन) 24 जुलैपासून सुरू होणार आहे.

भूमिगत मेट्रोचा 33.5 किमीचा भाग आरे कॉलनीपासून सुरू होतो. या मार्गावर तब्बल 27 स्थानके असणार आहेत. भाजप नेते विनोद तावडे यांनी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.

मुंबईच्या या पहिल्या भूमिगत मेट्रो प्रकल्पात 33.5 किमी लांबीचा भुयारी मार्ग असेल. हा मार्ग आरे कॉलनी येथून सुरू होईल. एकूण 27 स्थानके असतील. त्यापैकी 26 स्थानके भूमिगत असणार आहेत. या मेट्रो मार्गाचे काम 2017 मध्ये सुरू झाले होते. मात्र, कोरोनामुळे हे काम बरेच दिवस रखडले होते.

खोदकामातून एकूण 56 किलोमीटर लांबीचा रस्ता तयार करण्यात आला आहे. या मार्गावरील पहिला टप्पा आरे कॉलनी ते बीकेसी (वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स) आहे. पहिला टप्पा 24 जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे.

कफ परेड, विधान भवन, चर्चगेट, हुतात्मा चौक, सीएसटी मेट्रो, काळबादेवी, गिरगाव, ग्रँड रोड, मुंबई सेंट्रल मेट्रो, महालक्ष्मी, सायन्स म्युझियम, आचार्य अत्रे चौक, वरळी, सिद्धिविनायक, दादर, शितलादेवी, धारावी, बीकेसी, विद्यानगरी, सांताक्रूझ, डोमेस्टिक एअरपोर्ट, सहारा रोड, आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट, मरोळ नाका, एमआयडीसी, सीप्झ आणि आरे कॉलनी ही २७ स्थानके आहेत.

भूमिगत मेट्रो सेवा सकाळी 6.30 वाजता सुरू होईल आणि रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहील. ताशी 90 किमी वेगाने धावणाऱ्या ट्रेन्स दर काही मिनिटांनी प्रवाशांसाठी उपलब्ध होतील असले अहवालात म्हटले आहे.

दरम्यान, भाजप नेते विनोद तावडे यांनी यासंदर्भात ट्वीट करुन माहिती दिली आहे. मात्र, याबाबत अद्याप एमएमआरडीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. तसेच, महाराष्ट्र सरकारकडूनही यासंदर्भात काहीच सांगण्यात आलेले नाही. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.