ठाणे : पारसिक टेकड्यांमधील डाव्या बाजूच्या बोगद्यात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शेवटचा सुरुंग स्फोट घडवण्यात आला. त्यामुळे ऐरोली-काटई रस्ता मार्गी लागला आहे. या रस्त्यामुळे अर्ध्या तासाचे अंतर कमी होणार असून प्रवाशांचा वेळ आणि वाहनांचे इंधनही वाचणार आहे.
ऐरोली-काटई नाका रस्ता प्रकल्प भाग-१ आणि ठाणे-बेलापूर रस्ता ते राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ – बोगद्याचे आणि रस्त्याचे बांधकाम प्रगतीपथावर असल्यामुळे येत्या काही महिन्यांतच हा प्रकल्प पूर्ण होणार आहे.
ऐरोली-काटई नाका रस्ता प्रकल्पामुळे सात किलोमीटरचे अंतर कमी होणार असल्याने वाहन चालकांचा प्रवास नक्कीच कमी वेळेत पूर्ण होणार आहे.
एमएमआरडीएचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प नोव्हेंबर २०२३ मध्ये पूर्ण होणार होणार असल्याची माहिती प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिका-यांनी दिली.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे ऐरोली काटई नाका रस्ता प्रकल्प विस्तारीत पायाभूत सुविधा प्रकल्पाअंतर्गत हाती घेण्यात आलेला आहे. या प्रकल्पाच्या भाग – १ मध्ये बोगद्याचे व रस्त्याचे बांधकाम हे ऐरोली पूल ते ठाणे-बेलापूर रस्त्यापर्यंत आहे. या प्रकल्पाची विविध कामकाजांच्या दृष्टीने विविध भागांमध्ये विभागणी केलेली आहे. पहिला भाग १, ठाणे बेलापूर रस्ता ते राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ – ३.४३ कि.मी., असून भाग २ ऐरोली पुल ते ठाणे बेलापूर रस्ता हा २.५७ किमी आहे.
या प्रकल्पाचे फायदे अनेक असून, सर्वाधिक फायदा सद्य:स्थितीत त्रासदायक प्रवास करणा-या प्रवाशांना होणार आहे. त्यांना महापे किंवा ठाणे येथून मार्ग काढून जावे लागते. मात्र या प्रकल्पामुळे कल्याण- डोंबिवली आणि नवी मुंबईमधील अंतर ७ कि.मी. ने कमी होईल त्यामुळे वेळेत २० ते २५ मिनिटांची बचत होईल. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या ठिकाणी जाणा-या प्रवाशांना या प्रकल्पामुळे मोठया प्रमाणात फायदा होईल.
ऐरोली-काटई नाका हा प्रकल्प अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प असून ऐरोली, नवी मुंबई, मुंब्रा, कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि मुंबई या शहरातील लाखो लोकांना दिलासा देणारा हा प्रकल्प आहे. अशा प्रकल्पामुळे वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळते, कनेक्टिव्हिटी प्रदान होते आणि लोकांचा वेळ आणि इंधन वाचते. आम्ही पायाभूत सुविधांचा विकास करण्याकडे भर देत आहोत. मुंबई महानगर प्रदेशातील शहरांच्या विकासासाठी अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प राबवत आहोत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
पारसिक टेकड्यामधील भूयारीकरणाचे काम खूप अवघड आहे. आज डाव्या बाजूच्या बोगद्यात शेवटचा ब्लास्ट करून तो दोन्ही बाजूंनी खुला झाला आहे, त्यामुळे आता बोगद्याच्या दोन्ही बाजूंनी सूर्यप्रकाश दिसू शकतो. ह्या बोगद्याच्या दुसऱ्या बाजूच्या भूयारीकरणाचे काम लवकरच पूर्ण होईल. बोगद्याच्या दोन्ही बाजूंचे काम पूर्ण झाल्यावर प्रकल्पातील महत्त्वाचा आणि अवघड टप्पा पार होईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर शिळफाटा रस्त्यावरील अवजड वाहतूक कमी होईल आणि काटई नाका ते ऐरोली दरम्यान प्रवासात ३० मिनिटांनी कमी होईल. ज्याचा फायदा मुंबईहून कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूरकडे जाणाऱ्या प्रवाशांना होईल” असे एमएमआरडीएचे आयुक्त एस. व्ही.आर. श्रीनिवास म्हणाले.
प्रकल्पाची सद्यस्थिती व प्रकल्पाची सर्वसाधारण भौतिक प्रगती ६६.०८% झाली असून, प्रकल्पाची सर्वसाधारण आर्थिक प्रगतीदेखील ६५.८५% पर्यंत पोहचली आहे.