मुंबई : मुंबईकरांसाठी एक मोठी बातमी समोर आली असून बस प्रवास आता महाग होणार आहे. बेस्ट बसच्या प्रवासभाड्यामध्ये दुप्पट वाढ करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. ही भाडेवाढ 8 मे पासून लागू करण्यात येणार आहे.
बेस्ट बस भाडेवाढीबाबतच्या प्रस्तावाला मुंबई महापालिका प्रशासनापाठोपाठच परिवहन प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. याचा फटका सर्वसामान्य मुंबईकरांना बसणार आहे.
मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या बेस्टच्या बसभाड्यात या आठवड्यापासून दुप्पट वाढ होणार आहे. बेस्टने किमान भाड्यात दुपटीने वाढ केली आहे. साधारण बसचे किमान भाडे पाच रुपये आहे. त्यात आता वाढ होऊन 10 रुपये प्रस्तावित केले आहे. तर वातानुकुलित बसचे किमान भाडे सहा रुपये आहे ते बारा रुपये करण्यात आले आहे.
पाच किमीपर्यंतच्या अंतरासाठी आता 10 रुपये मोजावे लागणार आहेत. 10 किमी अंतरासाठी 15 रुपये, 15 किमी अंतरासाठी 20 रुपये तर 20 किमी अंतरासाठी 30 रुपये मोजावे लागणार आहेत. हे तिकिट दर नॉन एसी बससाठी आहेत.
एसी बससाठी तिकिटाचे दर वेगळे आहेत. त्यामध्ये पाच किमी अंतरासाठी आता 12 रुपये मोजावे लागणार आहेत. 10 किमी अंतरासाठी 20 रुपये, 15 किमी अंतरासाठी 30 रुपये तर 20 किमी अंतरासाठी 35 रुपये मोजावे लागणार आहेत. सवलतीचे दर यापेक्षा कमी असणार आहेत.
बेस्टच्या आर्थिक डबघाईवर तोडगा काढण्यासाठी ही भाडेवाढ करण्यात आली असल्याची माहिती आहे. त्यामुळे अगोदरच वाढत्या महागाईने वैतागलेल्या मुंबईकरांच्या खिशावर आणखी भार पडणार आहे. अनेक सामान्य नागरिक रिक्षा, टॅक्सी अशा खासगी वाहनांऐवजी माफक दरात वाहतूक सेवा पुरवणाऱ्या बेस्ट बसला पसंती देतात.
मुंबई आणि उपनगरातील अनेक भागांमध्ये बेस्ट बसला शेअर टॅक्सी आणि शेअर ऑटो रिक्षाचा पर्याय आहे. मात्र, शेअर रिक्षा आणि टॅक्सीचे भाडेही मुंबईतील अनेक गरीब वर्गाला परवडत नाही. त्यामुळे हे लोक तासनतास बसच्या रांगेत उभे राहून प्रवास करतात. मात्र, आता बेस्ट बसच्या तिकीटाच्या दरात दुप्पटीने वाढ झाल्याने सर्वसामान्य वर्गाला मोठा फटका बसणार आहे.