आठ महिन्यांचे गांधीनगर पुलाचे काम सहा वर्षे रखडले

* पोखरण रस्त्याला वाहतूक कोंडीचे ग्रहण

* अपूर्ण कामानंतरही ठेकेदाराला कोट्यवधींची बिले

ठाणे : गेल्या वर्षभरापासून ठाण्यातील विकासकामांना वेग आला असला तरी गांधीनगर पुलाचे काम आठ महिन्यांत पूर्ण होणारे मात्र तब्बल सहा वर्ष रखडल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे काम अपूर्ण असून सुद्धा पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने ठेकेदाराला कोट्यवधींची बिलेही काढण्यात आली आहेत, असा आरोप मनसे पदाधिकाऱ्याने केला आहे.

ठाण्यातील पोखरण रोड येथे २०१६ साली रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेतल्यानंतर येथील मुख्य रस्त्याची रूंदी वाढविण्यात आली. उपवन ते माजिवडा येथील रस्ता ४० मीटर रूंदीचा करण्यात आला आणि या रस्त्याच्या रूंदीकरणासोबत २०१७ ला गांधीनगर येथील पुलाची रूंदी वाढवण्याचे कामही ठाणे महापालिकेने हाती घेतले.

साधारण सहा कोटींचे हे काम मंजूर करण्यात आले होते. पण आठ महिन्यात पूर्ण करायचे काम सहा वर्षे रखडल्यामुळे पोखरण रोड २ वर नेहमीच नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. केवळ प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा फटका ठाणेकरांना सहन करावा लागत आहे असा आरोप मनसेच्या जनहित व विधी विभागाचे ठाणे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी केला आहे.

ठाणे महापालिकेने २०१७ रोजी ठेकेदाराला काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले असूनही आठ महिन्यात पूर्ण होणारे काम गेली सहा वर्षे कागदावरच आहे. मात्र तरीही याबाबत पालिका ठेकेदाराविरोधात कोणतीच कारवाई करत नाही. काम अपूर्ण असूनही पालिकेने मात्र आतापर्यंत या ठेकेदाराला सुमारे पाच कोटींपर्यंत रक्कमेची देयके मंजूर केली आहेत. त्यातील बहुतेक रक्कम देण्यात देखील आली असल्याची माहिती महिंद्रकर यांनी दिली.