उद्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपुजन
ठाणे: सत्त्याऐंशी वर्षे जुन्या विठ्ठल सायन्ना रुग्णालयाची इमारत पूर्णपणे पाडण्यात आली असून या जागी ९०० रूग्णशय्या क्षमतेचे मल्टी स्पेशालिटी रुग्णालय उभे राहणार आहे. अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भूमिपूजन होणार आहे.
भूमिपूजन सोहळ्याला केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजिनक बांधकाम विभागमंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार आहेत.
ठाणे जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातून दररोज शेकडो रुग्ण ठाण्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येतात. या रुग्णालयाच्या इमारती जुन्या झाल्या होत्या. यामुळे रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. रुग्णालयाची सध्याची क्षमता ही ३०० रूग्णशय्यांची होती. अनेक आधुनिक उपचार येथे उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत होती. रस्ते अपघातातील जखमींवर तातडीने उपचार करण्यासाठी पुरेशी सुविधा नसल्यामुळे त्यांना मुंबईला पाठवावे लागते. तातडीने उपचार मिळाल्यास असे रुग्ण दगावण्याची शक्यता असते. या सर्व बाबी लक्षात घेउन या रुग्णालयाच्या जागेवर सुपरस्पेशालिटी रुग्णालय करण्याचा निर्णय घेऊन त्यासंबंधीचा प्रस्ताव ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी तयार केला होता.
बुधवार १२ एप्रिल रोजी ८७ वर्ष जुने दगडी बांधकाम असलेली इमारत पाडण्यात आली. १९३६ साली नारायण विठ्ठल सायन्ना यांनी ही इमारत आपले वडील विठ्ठल सायन्ना यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रुग्णालयासाठी दान केली होती.