वातानुकूलित शौचालय उभारणीचे काम संथगतीनेच

अर्ध्याहून जास्त शौचालयांची बांधकामे शिल्लक

ठाणे : जाहिरातीच्या मोबदल्यात शहरात गरजेच्या ठिकाणी वातानुकूलित शौचालये उभारण्याचा प्रस्ताव २०१६ साली करण्यात आला होता. मात्र गेल्या सात वर्षात केवळ १२ ठिकाणीच वातानुकूलित शौचालये उभारण्यात आली आहेत.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत ठाणे शहरात वातानुकूलित शौचालये बांधून त्यावर संबंधित जी एजन्सी शौचालय बांधून देईल त्या एजन्सीला शौचालयाच्या वर जाहिरातीचे फलक लावण्याचे अधिकार देण्यात आले होते. महासभेतही या प्रस्तावाला मंजुरी देखील देण्यात आली आहे. महासभा अस्तित्वात असताना, महासभेत शहरात सुरु असलेल्या शौचालयांच्या कामावरून मोठा वादंग झाला होता. ज्या ठिकाणी शौचालय बांधण्याच्या जागा निश्चित करण्यात आल्या होत्या, त्या जागा बदलण्यात आल्या असल्याचे आरोप त्यावेळी नगरसेवकांनी केला होता . तर काही ठिकाणी चक्क फुटपाथवर शौचालय बांधण्यात आले असल्याचेही सभागृहाच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. या प्रस्तावानुसार स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत शहरात ३० ठिकाणी वातानुकूलित शौचालय बांधण्यात येणार आहे.

नियमाप्रमाणे शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरच त्यावर जाहिरात लावता येणार आहे. मात्र काही ठिकाणी शौचलये बांधण्याच्या आधीच जाहिरात फलक उभारण्यात आले असल्याचा आरोपही यापूर्वी करण्यात आला होता. यासाठी संबंधित ठेकेदाराला यापूर्वी ८४ लाखांची नोटिस देखील देण्यात आली होती.

तीनहात नाका परिसरात आणखी एक वातानुकूलित शौचालय उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तीनहात नाका परिसरासोबतच महाकाली मंदिर,विवियाना मॉल समोरील बाजू अशा परिसरांचा देखील समावेश करण्यात आला होता. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे केवळ तीनहात नाका परिसरात शौचालय उभारणीला मंजुरी देण्यात आली आहे.

पोखरण रोड नं १, तीनहात नाका फॉरेस्ट ऑफिस कॉर्नर, बेथनी हॉस्पिटल, माजिवडा पेट्रोल पंप बस स्थानकाच्या बाहेर, माजिवडा गाव, लोढा प्रकल्पाजवळ, मानपाडा जंक्शन, ब्रह्मांड सिग्नल शाळेजवळ, बाळकूम सिग्नल पाडा नं १, कोर्ट नाका पोलीस मैदान, गांधी नगर नाका, वाहतूक पोलीस कार्यालायाजवळ आणि दीप सोसायटीजवळ, बळवंत फडके चौक येथे वातानुकूलित शौचालये बांधण्यात आली आहेत.