२४ तास पाणीपुरवठा बंद
ठाणे : भिवंडी येथील माणकोली भागात सोमवारी सकाळी ठाणे शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. यामुळे पाणी पुरवठा बंद करून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. परिणामी शहराला पुढील २४ तासांहून अधिक काळ पाणीपुरवठा होऊ शकणार नसून त्याचबरोबर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात चार स्रोतांमार्फत दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यात महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून २५० दशलक्षलीटर, स्टेम प्राधिकरणाकडून ११५ दशलक्षलीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्षलीटर आणि मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो.
भिवंडी येथील माणकोली भागात सोमवारी सकाळी २०४४ मि.मी व्यासाची जलवाहिनी फुटली. मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. या वाहिनीतून शहराला पाणी पुरवठा होतो. ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या योजना आणि स्टेम प्राधिकरणामार्फत हा पाणी पुरवठा करण्यात येतो. फुटलेली जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून, यामुळे शहराला पुढील २४ तासांहून अधिक काळ पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. त्याचबरोबर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे, असे पालिकेने कळविले आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात ठाणेकरांपुढे पाणी टंचाईचे संकट उभे राहिले आहे.