कल्याण पश्चिमेत खाजगी बसचा ब्रेकफेल
कल्याण : कल्याण पश्चिमेत खाजगी बसचा ब्रेकफेल होऊन ती सोसायटीची संरक्षक भिंत तोडून थेट गाड्यांवर कोसळल्याची धक्कादायक घटना गोदरेज हिल परिसरात घडली. यामध्ये कोणाला दुखापत झाली की नाही याची नेमकी माहिती मात्र समजू शकली नाही. दैव बलवत्तर म्हणून सुदैवाने संभाव्य जीवितहानी टळली.
गोदरेज हिल परिसरात सोसायटीच्या रहिवाशांसाठी खासगी ट्रॅव्हल्सकडून बस चालवली जाते. गुरूवारी संध्याकाळी गोदरेज हिलवरून खाली उतरत असताना या मार्गावर असणाऱ्या एका वळणावर हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. खाली येत असताना अचानक बसचे नियंत्रण सुटले आणि खाली असणाऱ्या मलबारी सोसायटीची संरक्षक भिंत तोडून ही बस तिथल्या गाड्यांवर कोसळली.
बसचे ब्रेकफेल झाल्याने हा अपघात झाला असून सोसायटीतील २-३ गाड्यांचे नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली.