देशात आजही बाळासाहेबांची हवा कायम

भाईंदरमध्ये उद्धव ठाकरे यांचे शिंदे गटावर टीकास्त्र

भाईंदर : आपल्याकडे गुरु विसरणारी लोकं तयार झाली आहेत. गुरु आणि वडील चोरणारी लोकंही आहेत. चोरी करुद्या, पण संस्कार कधी चोरु नयेत. संस्कार हे जन्मजात असावे लागतात, असा खोचक टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला आहे. मीरा-भाईंदर येथील जैन मंदिराला भेट दिल्यानंतर उद्धव ठाकरे बोलत होते.

बाळासाहेब ठाकरेंचे भरपूर चाहते होते. त्यांना चाहत्यांची आवश्यकता कधीही पडली नाही. कोठेही गेले, तरी चाहतेच चाहते असायचे. देशात बाळासाहेबांची तेव्हापासून सुरु झालेली हवा आजही कायम आहे, असं सांगत उद्धव ठाकरे म्हणाले, “कठीण काळात कोण बरोबर येतो, हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण, पूजा असली की, सर्वजण तीर्थप्रसादाला येतात. पण, संकटसमयी कारणे सांगून दूर पळतात.

मी कधीच संकटाला संकट मानत नाही. संकटात संधी शोधण्याचे काम करतो. जो मर्द असतो, त्याला लढाई लढण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे विरोधक जेवढा ताकदवान असेल तेवढी लढाई लढण्यास हिंमत येते. अन् ही लढाई आम्ही जिंकणारच, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.

२५ वर्षे आमचे मित्र राहिलेले, आज ज्या रस्त्याने जात आहेत, तो मार्ग आमचा नाही. जे स्वप्न आम्ही पाहिले होते, ते आता तोडून-मोडून टाकले जात आहे. ते स्वप्न आणि हिंदुत्व आमचे नव्हते. धर्मावरून लोकांची दिशाभूल करायची आणि आपल्या ताब्यात ठेवायचे, हे राजकारण सुरु आहे, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले.

महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी आहे, मग देशात का लागू करत नाही. महाराष्ट्रात माता म्हणायचं आणि बाजूच्या राज्यात जाऊन खाता, हे कोणते हिंदुत्व आहे. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे आपण माणूस म्हणून जन्म घेतला असून, धर्म नंतर आपल्याला चिकटला आहे. त्याच धर्माचा आधार घेऊन देशावर कब्जा करायचा आणि सर्वांना गुलाम करायचे काम सुरु आहे. आताच आपण डोळे उघडले नाहीत तर परत मिटलेले डोळे कधीच उघडता येणार नाहीत. त्यामुळे आतातरी सर्वांनी जागे व्हावे, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले आहे.