ठाण्याचे प्रथम महापौर सतीश प्रधान यांचे देहावसान !

ठाणे : ठाणे नगरपालिकेचे प्रथम नगराध्यक्ष, ठाणे महानगरपालिकेचे प्रथम महापौर, शिवसेना नेते तसेच स्वर्गीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावणारे माजी खासदार सतीश प्रधान यांचे आज रविवारी दुपारी २ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८४ वर्षाचे होते.
मागील अनेक दिवस ते मधुमेह या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर नौपाडा येथिल खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई, नातंवंडे असा परिवार आहे.

ठाणे शहराचे प्रथम नगराध्यक्ष, प्रथम महापौर होण्याचा मान त्यांना जातो. ठाणे शहरातील राम गणेश गडकरी रंगायतन, दादोजी कोंडदेव स्टेडियम, मारोतराव शिंदे तरण तलाव ही श्री. प्रधान यांनी ठाण्याला दिलेली देणगी होय. सतीश प्रधान यांनी ठाणे शहराच्या विकासामध्ये तसेच शिवसेनेच्या संघटनात्मक मजबुतीसाठी मोठे योगदान दिले. त्यांनी ॲथलेटिक्स संघटनेचे अध्यक्षपद भुषवले होते. खासदार असताना अनेक समित्यांमध्ये त्यांनी काम केले होते. बाबरी मशिद पाडण्याच्या आंदोलनात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. शिवसेनेच्या अनेक आंदोलनांत त्यांचा सहभाग होता. संघटनेसाठी त्यांनी खस्ता खाल्ल्या होत्या. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे ते अतिशय विश्वासू सहकारी होते. त्यांचे निधन म्हणजे ठाणे शहरासाठी तसेच शिवसेनेसाठी मोठी हानी आहे. त्यांच्या जाण्याने शहराचे मोठे नुकसान झाले आहे.

सकाळी त्यांचे पार्थिव ज्ञानसाधना महाविद्यालयात अंत्यदर्शनाकरिता ठेवण्यात आले आहे. त्यांची अंत्ययात्रा सोमवारी सकाळी १० वाजता त्यांच्या निवासस्थानावरून निघेल.