ठाणेकरांनी नौपाडा गोखले रोडवर लुटला खरेदीचा आनंद

यंदा खरेदीत ३५ टक्क्यांनी वाढ

ठाणे: यंदाच्या दिवाळी सणानंतर ठाण्यातील गोखले रोडवरील दुकानदार आनंदित आहेत, कारण यावर्षी विक्रीत तब्बल ३० ते ३५ टक्के वाढ झाल्याचे समोर आले आहे.

खरेदीसाठी आवडीचे ठिकाण असलेल्या गोखले रोड व नौपाडा परिसरात या वेळी मागील वर्षीपेक्षा ग्राहकांची अधिक गर्दी उसळली होती. दिवाळीनिमित्त जाहीर केलेल्या आकर्षक ऑफर्स आणि सवलतींमुळे ग्राहकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली होती असे भाजपा व्यापारी सेलचे अध्यक्ष मितेश शहा यांनी सांगितले.

नौपाडा व गोखले रोड ठाण्यातील जुनी बाजार पेठ म्हणून प्रसिद्ध आहे. दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यासाठी ठाणेकर येथे खरेदीसाठी गर्दी करत असतात. गोखले रोड व नौपाडा परिसरात यंदा नौपाडा गोखले रोड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षीपेक्षा या वर्षी ठाणेकरांनी उत्तम प्रतिसाद या फेस्टिवलला दिला. मॉल व ऑनलाईन शॉपिंगपेक्षा लोकांनी गोखले रोडवर खरेदी करणे पसंत केले. गोखले रोडवर कपडे, ज्वेलर्स, दैनंदिन वापरातील वस्तू, इलेक्ट्रॉनिक उपकरणे अशी अनेक प्रकारची दुकाने आहेत, त्यामुळे दिवाळी खरेदीसाठी हे फेस्टिवल एक परिपूर्ण फॅमिली शॉपिंग डेस्टिनेशन झाले होते.

दिवाळीनिमित्त या संपूर्ण रस्त्याला विद्युत रोषणाई व कंदील लावून सजवले गेले होते त्यामुळे या बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत होते. त्याचसोबत काही कार्टून कॅरेक्टर्स लहान मुलांचे मनोरंजन करत होते. लाईव्ह इव्हेंट्स आंणि कार्यक्रमांमुळे ग्राहकांना शॉपिंगसोबत मनोरंजनाचा देखील आस्वाद घेता आला. ग्राहकांना दिवाळीनिमित्त अनेक प्रकारची सूटही देण्यात आली होती. यामुळे येथील दुकान मालकांना ३० ते ३५ टक्के नफा झाला आहे. ५० टक्केहून अधिक नव्या ग्राहकांची संख्या वाढली आहे.

महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होण्यासाठी आमदार संजय केळकर यांनी राबवलेल्या जनकल्याण कार्ड योजनेत गोखले रोडवरील सुमारे ८०हून अधिक दुकाने जोडली गेली आहेत. या कार्डद्वारे हजारो महिलांना किमान 15 % ते 50 % पर्यंतची सवलत मिळत असल्याने महिलांनी खरेदीचा मनसोक्त आनंद लुटला.