ठाणेकर वरिष्ठ तंत्रज्ञ श्रावणी शेलार ठरल्या उत्कृष्ट लाईनमन

ठाणे : ‘महावितरण’च्या भांडूप परिमंडळात काम करणा-या वरिष्ठ तंत्रज्ञ श्रावणी शेलार यांचा देश पातळीवर ‘उत्कृष्ट लाईनमन’या बहुमानाने सन्मान करण्यात आला आहे. केंद्र सरकार आयोजित ‘लाइनमेन दिवस २०२४’या कार्यक्रमात ‘इंडियन पॉवर सेक्टर’मध्ये मोलाचे योगदान दिल्याबद्दल दिल्ली येथील इंडिया हॅबिटेट सेंटरमध्ये सन्मान करण्यात आला.

सौ. शेलार पॉवर सेक्टरसारख्या पुरुष प्रधान क्षेत्रात कार्यरत आहेत. भांडुप परिमंडळातील ठाणे नागरी मंडळात, ठाणे-१ विभागातील ठाणे विभागात किसननगर उपविभाग येथे त्या वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कामात त्या कोणत्याही पुरुष सहका-यांपेक्षा कमी नाहीत. विशेष म्हणजे, वीज बिल वसुली, वीज संबंधित तक्रारींचे निवारण, वीज मीटर तपासणी आणि वीजचोरी पकडण्यासारखी धोकादायक कामे त्या एकदम चोखपणे करतात.
मागच्या एका वर्षात त्यांनी सेक्शन व्यतिरिक्त ९-१० मोठ्या वीजचोरी स्वत: पकडून दिल्या आहेत. याशिवाय, किसननगर येथील रोहित्र बिघाडाची तक्रारही ‘शून्य’ करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

श्रावणी शेलार यांचा जन्म रत्नागिरी येथील चिपळूण गावात झाला. त्यांचे वडील सुतार काम करतात. त्यांनी श्रावणीला चिपळूण येथे आयटीआयचे शिक्षण दिले व सौ.शेलार यांनी अप्रेंटीसनंतर २०१३ च्या भरती प्रक्रिया उत्तीर्ण झाल्या. महावितरणच्या कणकवली शाखेत तंत्रज्ञ म्हणून रुजू झाल्या. त्यानंतर, त्यांची बदली चिपळूणला झाली. तिथेही त्यांनी चांगले काम केले व २०२० मध्ये सौ. शेलार यांची बदली भांडुप परिमंडळातील किसननगर शाखेत झाली.

सन २०२० पासून त्यांनी चांगली कामगिरी केली असून केंद्रीय विद्युत प्राधिकरणातर्फे आयोजित ‘लाइनमेन दिवस २०२४’ रोजी ४ मार्चला महाराष्ट्रातील महावितरण कंपनीतील प्रादेशिक कार्यालय कोकण विभागामधील ‘इंडियन पॉवर सेक्टर’मध्येही मोलाचे योगदान दिल्याबद्दल त्यांना उत्कृष्ट लाईनमन म्हणून दिल्लीतील ‘इंडिया हॅबिटेट सेंटर येथे प्रशस्तीपत्र व पदक देऊन गौरविण्यात आले.

त्यांच्या यशाबद्दल •ाांडूप परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांनी त्यांचे अभिनंदन केले व ठाणे मंडळातही ‘जागतिक महिला दिन’ निमित्ताने आयोजित कार्यक्रमात आज त्यांचे सत्कार केले. यावेळी, ठाणे मंडळाचे अधीक्षक अभियंता युवराज मेश्राम व ठाणे-१ विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रमणी मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते.