ठाणे देशात अव्वल होणार; एमसीएचआयने पुढाकार घ्यावा !

* उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास
* क्रेडाई-एमसीएचआयच्या गृह प्रदर्शनाचे उद्घाटन

ठाणे : राज्य सरकारच्या माध्यमातून ठाणे शहरात क्लस्टर योजना यशस्वीपणे राबविण्यात येत असून ठाण्याचा ब्रॅण्ड सिटी म्हणून विकास करता येईल. ठाणे परिसरात विकासाची अनेक कामे सुरू असून, ठाण्याला देशातील क्रमांक १ चे शहर होण्यासाठी `एमसीएचआय’ने पुढाकार घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

`क्रेडाई-एमसीएचआय’ यांच्या वतीने ठाण्यातील हायलॅण्ड मैदानावर आजपासून १० फेब्रुवारीपर्यंत सुरू झालेल्या २२ व्या प्रॉपर्टी प्रदर्शनाचे उद्घाटन श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, ठाणे महापालिका आयु्क्त सौरभ राव, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुद्गल, `क्रेडाई-एमसीएचआय’चे अध्यक्ष डॉमनिक रोमेल, `क्रेडाई-एमसीएचआय’चे ठाणेचे गत अध्यक्ष व राज्य सरकारच्या `मित्र’चे अध्यक्ष अजय आशर, `क्रेडाई-एमसीएचआय’चे ठाणेचे अध्यक्ष जितेंद्र मेहता, स्टेट बॅंकेचे उपमहाव्यवस्थापक सुरजित त्रिपाठी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

`क्रेडाई-एमसीएचआय’च्या प्रदर्शनाचे २२ वे वर्ष असून, प्रदर्शनाची प्रगती होत आहे. या प्रदर्शनाला आपणही दरवर्षी भेट देत असून, माझीही प्रगती झाली. मला रॉयल्टी द्यायला हवी. पण आपण विनारॉयल्टी काम करणारे आहोत, अशी सुरुवात करीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याच्या विकासासाठी केलेल्या कामांची माहिती दिली. ठाणे हे तलावांचे शहर असून, शहराला निसर्गसौंदर्य लाभले आहे. सद्यस्थितीत जागतिक तापमानवाढीचे आव्हान निर्माण झाले असून, त्यासाठी पर्यावरण संवर्धन गरजेचे आहे. त्यादृष्टीकोनातून विकसकांनी काम करावे. महापालिकेबरोबर सहकार्य करून ठाणे शहराच्या प्रगतीसाठी विकसकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

गेल्या अडीच वर्षांत ठाणे महापालिका हद्दीत बोरिवली बोगदा, मेट्रो-४, मेट्रो-९ आदींसह विविध प्रकल्पांची ७० ते ८० हजार कोटी रुपयांची कामे झाली आहेत. ठाण्यातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी विविध प्रकल्प राबवविले जात असून, ठाणे हे देशात विकासाचे मॉडेल होईल, यासाठी प्रयत्न करीत आहोत, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी ठाणे शहरात राबविल्या जात असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. ठाणे शहराला २०३० पर्यंत वेगळी ओळख निर्माण होईल. सध्या शहराला २०५५ पर्यंत पुरेल एवढा पाणीपुरवठा होईल, असे नियोजन केले जात आहे. यंदा १०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा उपलब्ध झाला असून, पुढील वर्षी आणखी १०० दशलक्ष लिटर पाणी मिळेल. तसेच सुर्या धरणातून पाणी उपलब्ध होणार असून, शाई व काळू धरण उभारण्यासाठी हालचाली सुरू आहेत. त्यामुळे ठाण्याला पाणीटंचाई भासणार नाही, असा विश्वास माहिती श्री. राव यांनी व्यक्त केला.

मुंबईपेक्षा ठाणे हे किमतीच्या दृष्टीकोनातून परवडणारे शहर असून, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारकि‍र्दीत झालेल्या कामांमुळे ठाण्याचा विकासदर सर्वाधिक आहे, याबद्दल `मित्र’चे अध्यक्ष अजय आशर यांनी आनंद व्यक्त केला. तर राज्य सरकारकडून होणाऱ्या सहकार्याबद्दल `क्रेडाई-एमसीएचआय’चे ठाणेचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी राज्य सरकारने घेतलेल्या विविध निर्णय व विकासकामांबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच विकासाची गती कायम राखण्यासाठी रेडीरेकनर दर वाढवू नये, अशी मागणी केली.