दोन पादचारी पुल खुले; ठाणे स्थानक होणार मोकळे

ठाणे: मुंबई आणि कल्याणच्या दिशेकडील दोन्ही पादचारी पुल खुले करण्यात आले आहे, त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकातून बाहेर पडण्यासाठी तारेवरची कसरत करणाऱ्या प्रवाशांची वाट मोकळी झाली आहे. खासदार राजन विचारे यांच्या हस्ते याचे लोकार्पण करण्यात आले.

ठाणे पूर्व आणि पश्चिम यांना जोडणारा ठाणे महापालिकेचा पादचारी पूल धोकादायक झाल्याने रेल्वेकडून २८ मे २०१९ रोजी तोडण्यात आला होता. मध्य रेल्वेने नागरिकांना पादचारी पुलाचा वापर करण्याची मुभा दिली होती. या स्थानकातून रोज सुमारे आठ लाख प्रवासी ये-जा करत असतात. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन खासदार राजन विचारे यांच्या पाठपुराव्यामुळे महापालिकेने ठाणे रेल्वे स्थानकातील कल्याण व मुंबई दिशेस नवीन पादचारी पूल व मुंब्रा येथील पादचारी पूल अशा एकूण तीन पुलांसाठी महापालिकेने २४ कोटी निधी रेल्वेला देण्याचे मंजूर केले. त्यातील १२ कोटींचे दोन हप्ते देण्यात आले. पण नंतर कोव्हिड काळात हे पूल रखडले.

गेल्या तीन वर्षात या रखडपट्टीमुळे लोकलला थोडा उशीर झाला किंवा एकाच वेळी दोन किंवा त्याहून अधिक फलाटांवर गाडी आल्यास उतरणार्‍या प्रवाशांमुळे पादचारी पुलावर तोबा गर्दी होत होती. भविष्यात एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त होत होती. पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी डिसेंबर २०२३ मध्ये पाच कोटींचा निधी रेल्वेला सुपूर्द केला आणि तातडीने कामाला सुरुवात झाली. त्यासाठी २-३ वेळा मेगाब्लॉक घेऊन गर्डर रात्री टाकण्यात आले. मुंबई आणि कल्याण दिशेकडील हे दोन्ही पूल अवघ्या तीन महिन्यात पूर्ण झाले. त्यामुळे मध्य रेल्वेने पूल नागरिकांसाठी खुला करण्याचा निर्णय घेतल्यानंतर खासदार राजन विचारे यांच्या हस्ते या पुलांचे लोकार्पण करण्यात आले.

मुंबई दिशेकडील पादचारी पुलाची लांबी १३० मीटर तर रुंदी ५:५० मीटर आहे. फलाट क्रमांक १०, ९/१०, ७/८, ५/६ येथे उतरते जिने बसविण्यात आले आहेत. भविष्यात पुढे फलाट क्रमांक ३/४ व २/१ जोडण्याचे नियोजन रेल्वे करणार आहे. कल्याण दिशेकडील पादचारी पुलाची लांबी ७६ मीटर व रुंदी ४.८० मीटर आहे. एसटी डेपो ते कोपरी चेंदणी कोळीवाडा जोडणारा पूल असून या पुलाला ३/४ व ५/६ क्रमांकाच्या फलाटाला जोडण्यात आला आहे.