ठाणे आरटीओचा अडीच कोटींचा महसूल बुडाला!

कर्मचाऱ्यांच्या संपाचा पहिल्याच दिवशी दणका

ठाणे : अनेक वर्षांच्या प्रलंबित मागण्यांसाठी प्रादेशिक परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी राज्यभर संप पुकारला असून ठाणे विभागाला याचा चांगलाच दणका बसला. नोंदणी, दंड, परवाने, आदी कामे बंद असल्याने पहिल्याच दिवशी ठाणे विभागाला अडीच कोटींचा फटका बसला आहे.

मंगळवारपासून मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सर्व परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला आहे. या दिवशी ठाणे प्रादेशिक कार्यालयामध्येही कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन ठेवले. या काम बंद आंदोलनाने पहिल्याच दिवशी ठाणे विभागाला मोठा आर्थिक फटका बसला. ऑनलाइन आणि इतर सेवांवर या संपाचा परिणाम झाला. एका दिवसात सुमारे अडीच कोटींचे नुकसान झाले. कार्यालयातील कर्मचाऱ्यांना प्रशासकीय कामकाजाबरोबर वाहन चालक, मालक हे ग्राहक सेवेचे काम करावे लागते. यामुळे प्रशासकीय कामात गुंतागुंत निर्माण झाली आहे. या दुहेरी कामांच्या बोजामुळे कर्मचारी त्रस्त आहेत.

महसुली विभागनिहाय जे सामान्य लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांसाठी अन्यायकारक आहे, असे महसुली विभागनिहाय बदल्यांचे धोरण रद्द करण्यात आलेले नाही, पदोन्नतीसाठी विभागीय परीक्षा सक्तीच्या करण्यात आल्याने ज्या कर्मचाऱ्यांचे वय 50 असेल त्यांनी ह्या परीक्षा कशा द्यायच्या हा पेच कर्मचार्‍यांसमोर निर्माण झाला आहे. सोबतच आकृतीबंधाची योग्य अंमलबजावणी केली जात नाही, कर्मचाऱ्यांच्या हिताच्या कळसकर समितीच्या तरतुदींची अंमलबजावणी केली जात नाही, बदल्या, बढत्यांमध्ये सेवा ज्येष्ठतेचा विचार केला जात नाही. अशा विविध मागण्यांसाठी मोटार वाहन कर्मचारी संघटनेने हा संप पुकारला आहे.

ठाणे विभागीय प्रादेशिक परिवहनच्या कार्यालयामध्ये रोज सुमारे दंड आणि इतर शुल्क असे मिळून १०-१५ लाख रुपये डीडी अथवा धनादेशाच्या माध्यमातून जमा होतात. तर ऑनलाईनमधून मिळणारी रक्कम दिवसाला सुमारे दोन ते अडीच कोटीपर्यंत असते. ही रक्कम संपामुळे जमा होऊ शकली नाही.