बदलापूर-अंबरनाथमधील सोसायट्यांचा ठाणे फेरा टळणार

बदलापूर येथे हाऊसिंग फेडरेशनची शाखा

ठाणे : बदलापूर-अंबरनाथमधील गृहनिर्माण सोसायट्यांचा ठाण्याचा फेरा टळणार आहे. ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या बदलापूर पूर्वेकडील नूतन शाखेचे उद्घाटन येत्या ४ फेब्रुवारीपासून रोजी सकाळी १० वाजता भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्याहस्ते आणि सहकारी संस्था अंबरनाथचे सहायक उपनिबंधक चेतन चौधरी यांच्या उपस्थितीत होणार आहे.

सकाळी १०:३० वाजता गांधी चौक येथील काटदरे मंगल कार्यालयात मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी गुरुवारी ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

बदलापूर-अंबरनाथ वासियांना ही नववर्षाची भेट असून एक प्रकारे फेडरेशनच्या निवडणुकीत गृहसंकुलांना दिलेल्या आश्वासनाची ही परिपुर्ती असल्याचे सीताराम राणे यांनी सांगितले. ठाणे जिल्ह्यातील वेगाने वाढत असलेल्या बदलापुर- अंबरनाथ उपनगरात तीन ते चार हजार सहकारी गृहनिर्माण सोसायट्या असून येथे ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे तब्बल दीड हजार सभासद आहेत. गृहनिर्माण संस्थासंबंधी तक्रारी व समस्याचे निराकरण करण्यासाठी या सभासदांना ठाणे येथे यावे लागत असते. त्यातच आजघडीला नागरीकरण वाढत असल्याने तसेच, भविष्यात बदलापूर-अंबरनाथ भागात आणखी गृहनिर्माण प्रकल्प होत आहेत. त्यामुळे गृहनिर्माण संस्थाविषयक अडीअडचणी सोडविण्यासाठी तसेच गृहनिर्माण संस्थांना कामकाजात मार्गदर्शन व मदत करण्याच्या उद्देशाने ठाणे डिस्ट्रीक्ट को-ऑप.हौसिंग फेडरेशनची नविन शाखा बदलापूर (पूर्व) येथील ४०३, तेलवणे टॉवर, स्टेशन पाडा, मच्छी मार्केटसमोर सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती सीताराम राणे यांनी दिली आहे.