डॉ. अश्विनी जेनिशा, डॉ. पूजा कटरे, डॉ. सायली लखोटे ठरल्या पहिल्या तीन क्रमांकाच्या विद्यार्थिनी
ठाणे: महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठातून पॅथॉलॉजी (शरीर विकृतीशास्त्र) विषयाच्या राज्याच्या गुणवत्ता यादीत पहिले तिन्ही क्रमांक ठाणे महापालिकेच्या राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी पटकावले आहेत. पहिला क्रमांक डॉ. अश्विनी जेनिशा, दुसरा क्रमांक डॉ. पूजा कटरे आणि तिसरा क्रमांक डॉ. सायली लखोटे या विद्यार्थिनींना मिळाला. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी या तिन्ही विद्यार्थिनींचा सत्कार केला.
ठाणे महापालिकेचे राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ, नाशिक यांच्याशी संलग्न पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू झाला आहे. या अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या बॅचमधील शरीर विकृतीशास्त्र आणि सामाजिक वैद्यकशास्त्र (कम्युनिटी मेडिसीन) या विषयात महाविद्यालयाच्या एकूण सहा विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी परीक्षेत नेत्रदीपक यश मिळाल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. राकेश बारोट यांनी दिली.
त्यातील, शरीर विकृतीशास्त्र या विषयाच्या राज्याच्या गुणवत्ता यादीतील प्रथम ११ विद्यार्थ्यांमध्ये महाविद्यालयाच्या पाच विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकावला. त्यापैकी, गुणवत्ता यादीत पहिले तिन्ही क्रमांक पटकावणाऱ्या अनुक्रमे डॉ. अश्विनी जेनिशा, डॉ. पूजा कटरे आणि डॉ. सायली लखोटे या विद्यार्थिनींचा प्रातिनिधिक सत्कार आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते शुक्रवारी सन्मानचिन्ह आणि शाल देऊन करण्यात आला. याप्रसंगी, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त उमेश बिरारी, अधिष्ठाता डॉ. राकेश बारोट, वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतना नितील, उपअधिष्ठाता (यूजी) डॉ. स्वप्नाली कदम व उपअधिष्ठाता (पीजी) डॉ. मिलिंद उबाळे, डॉ. दिनेश समेळ, डॉ. शिवकुमार कोरी उपस्थित होते. त्याचबरोबर, सामाजिक वैद्यकशास्त्र या विषयाच्या गुणवत्ता यादीत तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या डॉ. जयलक्ष्मी नायर यांचा सत्कार त्यांच्या वतीने डॉ. दिनेश समेळ यांनी स्वीकारला.
राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयातून विकृतीशास्त्र या विषयात ११० विद्यार्थी, तर, सामाजिक वैद्यकशास्त्र या विषयात ११८ विद्यार्थी बसले होते. या विषयाच्या गुणवत्ता यादीत राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या एकूण सहा विद्यार्थांचा समावेश आहे. विकृतीशास्त्र विषयाच्या गुणवत्ता यादीत महाविद्यालयाच्या डॉ. चैताली बनगरे यांना पाचवा तर डॉ. प्रियंका ढाकरे यांना अकरावा क्रमांक मिळाला असल्याची माहितीही डॉ. बारोट यांनी दिली.