Thanevaibhav Online
7 October 2023
राज्य बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा
ठाणे: महाराष्ट्र राज्यात अतिशय प्रतिष्ठित मानली जाणारी वरिष्ठ आंतर जिल्हा व राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी संपूर्ण राज्यातून अनेक धडाडीच्या बॅडमिंटनपटूंनी सहभाग घेतला होता. तर आंतर जिल्हा राज्य अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्यांदाच एकूण २४ संघ सहभागी झाले होते. यात गडचिरोली, चंद्रपूर या संघांनी देखील उत्तम खेळाचे सादरीकरण केले.
या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्र राज्य शिवछ्त्रपती जीवन गौरव पुरस्कार विजेते श्रीकांत वाड यांच्या हस्ते करण्यात आला. ठाणे जिल्ह्याच्या पुरुष आणि महिला संघाने उत्तम कामगिरी बजावली असून त्यांनी या मानाच्या स्पर्धेत रौप्य पदक पटकावले आहे. आंतर जिल्हा राज्य अजिंक्यपद स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात माननीय माजी क्रीडामंत्री सुनिल केदार हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते खेळाडूंचा आणि संघाचा सत्कार करण्यात आला.
राज्य सिनियर अजिंक्यपद स्पर्धेत पुन्हा एकदा ठाणेकर खेळाडूंनी वर्चस्व प्रस्थापित केले आहे. दुहेरीत तीन पैकी दोन गटांत सर्वच पदकं ठाणेकर खेळाडूंनी स्वतःच्या नावे केली आहेत. एकेरीत प्रथमेश कुलकर्णी याने आपल्या वयाच्या मानाने खूपच प्रभावशाली खेळाचे सादरीकरण करीत वरिष्ठ आणि आघाडीच्या खेळाडूंशी बरोबरी साधीत कांस्य पदकाची कामगिरी केली आहे. तसेच गतवर्षी आपल्या खेळाच्या जोरावर ठाणेकर संघाला अजिंक्यपद पटकावून देणाऱ्या आर्या कोरगावकर हिने देखील कांस्य पदकाला गवसणी घातली आहे.
दुहेरीत पुरुषांमध्ये पुन्हा एकदा ठाणेकर कुवाळे बंधू हे अजिंक्यवीर ठरले आहेत. विराज आणि विप्लव कुवाळे यांनी ठाणेकर चॅम्पियन जोडी आणि रेल्वे संघात देखील खेळणारे कबीर कंझारकर आणि अक्षय राऊत यांचा पराभव करून अजिंक्यपद पटकावले. तर नवनिर्वाचित जोडी अभ्युदय चौधरी आणि झेको सिये यांनी आणि दीप रांभिया व अक्षन शेट्टी यांनी कांस्य पदक पटकावले आहे.
मिश्र दुहेरीत पुन्हा एकदा ठाणेकर जोडी प्रतिक रानडे आणि मेहेक नायक या जोडीने सुवर्णपदक पटकावले आहे. तर ठाणेकर दीप रांभिया व अक्षया वारंग हे रौप्य पदकाचे मानकरी ठरले आहेत.
या भरघोस यशाने ठाणेकर बॅडमिंटन विश्र्वात कमालीचा हर्षउल्हास निर्माण झाला आहे.
या विजयाबद्दल ज्येष्ठ प्रशिक्षक व ठाणे शहर व जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत वाड, मयूर घाटणेकर, अक्षय देवलकर व विघ्नेश देवळेकर तसेच क्रीडा अधिकारी मिनल पालांडे आणि ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या संपूर्ण टीमने त्यांचे अभिनंदन केले आहे.