ठाणे जिल्ह्यात नवीन मतदारांचा टक्का वाढला

ठाणे: ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघातील मतदार पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये १८ ते १९ वयोगटामध्ये ३९,५९० मतदारांची नव्याने भर पडली आहे. तर २० ते २९ या वयोगटात ४३,८८९ मतदारांची वाढ झालेली आहे. नव मतदारांचा टक्का वाढल्याने आगामी लोकसभा आणि त्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्काही वाढण्याचा विश्वास व्यक्त होत आहे.

ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे हे अंतिम मतदार यादीच्या प्रसिध्दी निमित्ताने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमातंर्गत २७ ऑक्टोबर, २०२३ च्या प्रारुप मतदार यादीत १,७७,०७८ मतदारांची नाव नोंदणी झाली. तसेच १,२८,४४७ मतदारांची वगळणी करण्यात आली. त्यामुळे अंतिम मतदार यादीमध्ये ४८,६३१ मतदारांची निव्वळ वाढ होऊन एकूण मतदारांची संख्या ६३,९२,५२० इतकी झालेली आहे. त्यानुसार १६,७८५ पुरुष मतदारांची, ३१,७१५ स्त्री मतदारांची आणि १३१ तृतीयपंथी मतदारांची निव्वळ वाढ झालेली आहे. महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, गृहनिर्माण सोसायट्या यांच्या सहकार्यामुळे यंदा महिलांच्या मतदार नोंदणीत लक्षणीय वाढ झालेली दिसून येते. त्यामुळे मतदार यादीतील स्त्री-पुरुष गुणोत्तर ८४८ वरुन ८५३ इतके झाले आहे.

या पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये १८ ते १९ वयोगटामध्ये ३९,५९० मतदारांची नव्याने भर पडली आहे. तसेच २० ते २९ या वयोगटात ४३,८८९ मतदारांची वाढ झालेली आहे. प्रारुप यादीत १८ ते १९ या वयोगटाची मतदार संख्या ३०,१३० (०.३१ टक्के) होती, ती जानेवारीच्या अंतिम मतदार यादीत ६९,७२० (१.०९ टक्के) इतकी झालेली आहे. तर २० ते २९ वयोगटाची प्रारुप यादीतील मतदार संख्या ०९,७९.१५३ (१०.०४ टक्के) होती, ती अंतिम यादीत १०,२३,०४२ (१६ टक्के) इतकी झालेली आहे. विविध सामाजिक संस्था, महाविद्यालये यांनी राबविलेल्या मतदार नोंदणी शिबिरांमुळे या वयोगटाच्या टक्केवारीत वाढ झाल्याची माहिती श्री.शिनगारे यांनी दिली.