जिल्हास्तरीय खुल्या सब ज्युनिअर बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा
ठाणे : कल्याण येथे 20 ते 22 डिसेंबर 2024 दरम्यान पार पडलेल्या योनेक्स सनराइज ठाणे जिल्हास्तरीय खुल्या सब ज्युनिअर बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंनी दहा गटांत ११ पदकांची कमाई केली.
९, ११, १३, १५ आणि १७ वर्षाखालील मुला-मुलींसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सावळाराम बॅडमिंटन हॉलमध्ये या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेतील दहा गटांमध्ये एकूण 11 पदकांची कमाई ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंनी केली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहातील खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल येथे चालवण्यात येणाऱ्या सय्यद मोदी प्रशिक्षण योजनेतील म्हणजेच ठाणे बॅडमिंटन अकॅडमीतील सर्व उभरत्या गुणी चिमुकल्या खेळाडूंनी या स्पर्धेत भरघोस यश प्राप्त करीत आपले वर्चस्व निर्माण केले आहे. त्यांनी प्राप्त केलेल्या 11 पदकांमध्ये तीन सुवर्ण दोन रौप्य आणि सहा कांस्य पदकांचा समावेश आहे.
या स्पर्धेत नऊ वर्षाखालील मुलींमध्ये एकेरीत खनक करडे ही सुवर्णपदकाची मानकरी ठरली आहे. तर नऊ वर्षाखालील मुलांच्या एकेरीच्या गटात योहान नायर याने रौप्य पदक पटकावले आहे. ११ वर्षाखालील मुलींच्या गटात एकेरीमध्ये ठाणे बॅडमिंटन अकॅडमीमधील प्रांजल पाटील हिने सुवर्णपदक आपल्या नावे केले आहे. त्याचप्रमाणे राज्य अजिंक्य वीर ॲल्फी एम. हा या स्पर्धेत देखील ११ वर्षाखालील मुलांमध्ये सुवर्णपदकाचा मानकरी ठरला आहे. 11 वर्षाखालील मुलींमध्ये शनाया तवाते हिने कांस्यपदक पटकावले आहे. १३ वर्षाखालील मुलांच्या गटात ॲल्फी आणि मुलींच्या गटात अश्र्विका नायर या दोघांनी एकेरीमध्ये कांस्यपदक पटकावले आहे तसेच याच स्पर्धेत शुभ्रा कुलकर्णी हिनेदेखील कांस्यपदक पटकावले आहे. 17 वर्षाखालील मुलांच्या गटात ऋतुराज गावडे याने रौप्य पदक तर मोहित कांबळे याने कांस्यपदक पटकावले आहे.
ठाणे बॅडमिंटन अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक श्रीकांत वाड यांनी हे विजेते खेळाडू तसेच त्यांचे पालक यांचे अभिनंदन केले.