राम्भीया-वारंग यांना राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक आणि रौप्य पदक
ठाणे: बंगलोर येथील पदुकोण द्रविड स्पोर्ट्स सेन्टर येथे नुकत्याच पार पडलेल्या ऑल इंडिया सिनियर रँकिंग या राष्ट्रीय दर्जाच्या अजिंक्यपद स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या गटात क्रमवारे सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशी तीनही पदकं ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंनी आपल्या नावे करून राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर ठाणे जिल्ह्याचे नाव झळकावले आहे. या स्पर्धेत विविध राज्यांतील अव्वल क्रमांकाचे बॅडमिंटनपटू सामील झाले होते.
या स्पर्धेनंतर लगेचच डेहराडून येथे पार पडलेल्या ३८व्या नॅशनल गेम्स मध्ये देखील महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करताना दीप राम्भीया आणि अक्षया वारंग या जोडीने रौप्य पदकाला गवसणी घातली आहे.
बंगलोर येथील राष्ट्रीय स्तरावरील पार पडलेल्या या स्पर्धेत पहिल्या सामन्यापासून दीप आणि अक्षया या जोडीने अजिंक्यपद पटकवण्याचे आपले इरादे स्पष्ट केले होते. त्यांनी रोहित व रुदुवर्षीनी या तामिळनाडू जोडीचा 21-18, 14-21, 16-21 असा पराभव करीत उप-उपांत्य फेरीत आपली जागा पक्की केली. उप-उपांत्य फेरीच्या सामन्यात त्यांनी बलाढ्य जोडी नितीन व अनघा पै यांचा 21-19, 21- 18 अशा सरळ सेट मध्ये पराभव करीत उपांत्य फेरीत धडक मारली. याच वेळी उप-उपांत्य फेरीच्या इतर सामन्यांमध्ये ठाणेकर खेळाडू जोडी अनघा व अमन हे कडवी झुंज देत होते. प्रतिक रानडे याने तारिणी हिला साथीला घेत उपउपांत्य फेरीच्या सामन्यात ध्रुव रावत आणि राधिका शर्मा या बलाढ्य जोडीचा 15-21, 22-20 21-18 अशा दीर्घकाळ चाललेल्या सामन्यात वरचढ ठरित उपांत्य फेरीमध्ये आपली जागा पक्की केली, परंतु उपांत्य फेरीच्या सामन्यात ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्याच अमन आणि अनघा यांच्यासोबत झालेल्या लढतीमध्ये प्रतिकला पराभव पत्करावा लागला. अनघा आणि अमन यांनी संपूर्ण स्पर्धेत आपल्या उत्तम कामगिरीने सर्वच बॅडमिंटन प्रेमींची मने जिंकली. अंतिम फेरीत देखील त्यांनी उत्तम खेळाचे सादरीकरण केले परंतु विजयाची मानकरी दीप आणि अक्षया ही जोडी ठरली.
उत्तराखंड येथील डेहराडून येथे पार पडलेल्या 38 व्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करताना दीप आणि अक्षया या जोडीने पुन्हा एकवार ठाणेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. अक्षया वारंग आणि दीप रामभिया या ठाणेकर जोडीने बेंगलोर पाठोपाठ डेहराडून येथे झालेल्या नॅशनल गेम्स मध्ये देखील रौप्य पदक पटकावले आहे.
यापुढे देखील आपण तंत्रशुद्ध पद्धतीने आणि दुप्पट जोमाने खेळाडूंचा सराव घेत त्यांना येणाऱ्या पुढील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सामन्यांसाठी देखील असेच उत्तमरित्या तयार करू, असे ठाणे बॅडमिंटन अकॅडमीचे ज्येष्ठ प्रशिक्षक श्रीकांत वाड यांनी आवर्जून नमूद केले आहे.
या यशात सर्व प्रशिक्षकांचा सिंहाचा वाटा आहे आणि त्यासाठी श्रीकांत वाड, वरिष्ठ प्रशिक्षक मयूर घाटणेकर व अक्षय देवलकर, मितेश हाजीरनिस, राजीव गणपुले, श्रीकांत भागवत, विघ्नेश देवळेकर, कबीर कंझारकर, अमित गोडबोले, प्रसेंजित शिरोडकर, फुलचंद पासी, एकेन्द्र दर्जी या ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या संपूर्ण प्रशिक्षक टीमचे अभिनंदन क्रीडा उपायुक्त मीनल पालांडे यांनी केले आहे.