भंडार्लीच्या जागेचे भाडे देण्यासाठी ठामपाची वर्षभरानंतर हालचाली

ठाणे : कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी भंडार्ली येथील खासगी जागेत तात्पुरत्या स्वरूपात घनकचरा विल्हेवाटीचा प्रकल्प उभारण्यात आला होता. मात्र गेल्या ११ महिन्यांपासून जागा मालकाला भाडेच देण्यात आले नसल्याची बाब समोर आली आहे.

वर्षभरानंतर जागा मालकाला भाडे देण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या वतीने तयार करण्यात आला आहे. तातडीचा विषय म्हणून सदरचा प्रस्ताव महापालिका आयुक्त तसेच प्रशासक अभिजित बांगर यांच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे.

ठाणे महापालिकेच्या वतीने २५ ऑक्टोबर २०२३ पासून डायघर प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरु झाला असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र अजूनही डायघरमध्ये पूर्ण क्षमतेने ठाणे महापालिकेला हा प्रकल्प सुरु करता आलेला नाही. त्यामुळे अजूनही काही टन कचरा हा ठाणे शहरातील सीपी टॅंक परिसरातच टाकला जात आहे. दुसरीकडे डायघर प्रकल्प सुरु करण्यापूर्वी दिवा वासियांचा रोष कमी करण्यासाठी भंडार्ली या ठिकाणी खासगी जागेमध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात प्रकल्प सुरु करण्यात आला होता. यावेळी काही महिन्यांमध्येच डायघर प्रकल्पही सुरु करण्याची घोषणा करण्यात आली होती. भंडार्ली येथील ज्या खाजगी जागेत हा प्रकल्प उभारण्यात आला होता त्या जागा मालकासोबत भाडेकरारनामा देखील करण्यात आला होता. यामध्ये ३३,९४३ चौ.मी जागेसाठी हा करारनामा ठाणे महापालिकेने केला होता. या जागेसाठी दोन कोटी ८४ लाख ४३,८७६ रुपये वार्षिक भाडे निश्चित करण्यात आले.

ज्यावेळी ही जागा ठाणे महापालिकेच्या ताब्यात आली त्यावेळी सुरुवातीच्या काही महिन्याचे भाडे जागा मालकाला अदा करण्यात आले. त्यानंतर जागा मालकाला कोणत्या दराने भाडे द्यायचे याबाबत प्रशासकीय पातळीवर दर निश्चित होत असल्याने या काळात जागा मालकाचे बिल देखील काढण्यात आले नव्हते. आता ११ महिन्यांनी ठाणे महापालिकेकडून भाडे देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो आयुक्तांच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे.