ठामपाचे दायित्व ३४०० कोटींवरून १३०० कोटींवर

काटकसर, अतिरिक्त खर्चावर नियंत्रण, आर्थिक शिस्त

ठाणे : गेल्या तीन वर्षांत ठाणे महापालिकेने खर्चात काटकसर, अनावश्यक खर्चावर नियंत्रण, मोठ्या प्रकल्पांना कात्री आणि राज्य-केंद्र शासनाचा विकास निधी या बरोबरच आर्थिक शिस्त बाळगल्याने ठाणे महापालिकेचे ३४०० कोटी रुपयांचे दायित्व १३०० कोटींवर आले आहे. त्यामुळे महापालिकेने सुस्कारा सोडला आहे.

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून मोठ्या प्रकल्पांना कात्री लावण्यात आल्याने हे शक्य झाले आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षांपर्यंतची सर्व देणी देण्यात आली असून येत्या वर्षभरात दायित्वाचा भार ४५० ते ५०० कोटींवर येण्याची चिन्हे आहेत.

ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी गेल्या वर्षी आर्थिक शिस्तीचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये खर्चावर नियंत्रण ठेवण्यासोबतच कोणत्याही नव्या किंवा ज्या मोठ्या प्रकल्पांची घोषणा चार ते पाच वर्षांपूर्वी करण्यात आली होती त्याचा समावेशही या अर्थसंकल्पात करण्यात आला नव्हता. आयुक्त बांगर यांच्यापूर्वी कोरोनाकाळात उत्पन्न आणि खर्चाचे गणित बिघडल्याने पालिकेची परिस्थिती बिकट झाली. अजूनही या परिस्थितीमध्ये फार सुधारणा झालेली नाही. महापालिकेचा मालमत्ता कर विभाग तसेच इतर विभागांकडून अपेक्षित करवसुली होत असली तरी ही रक्कम कोरोनाकाळात पालिकेवर वाढलेले दायित्व कमी करण्यावर खर्च होत होती. त्यातच सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांचे वाढलेले पगार, ठाणे परिवहन उपक्रमाच्या अनुदानाचा वाढता भार आणि जुन्या विकासकामांची देयके अदा करताना महापालिका प्रशासनाची अक्षरश: दमछाक होत होती.

ठाणे महापालिकेवर तीन वर्षांपूर्वी तब्बल ३४०० कोटींचे दायित्व होते. त्यानंतर दायित्वाचा भार २७४२ कोटींपर्यंत येऊन ठेपला. मात्र पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी घालून दिलेले आर्थिक शिस्तीचे धोरण यामुळे दायित्वाचा भार गेल्या दोन वर्षात कमी झाला आहे. प्रत्येक वर्षी ६०० ते ७०० कोटींची बिले अदा करण्याचे नियोजन पालिका प्रशासनाने आखल्यामुळे आता केवळ १३०० कोटींचा दायित्वाचा भाग ठाणे महापालिकेवर राहिला आहे. यामध्ये भांडवली खर्चापोटी १३०० कोटी तर महसुली खर्चापोटी १५० कोटींचे दायित्व शिल्लक आहे. आतापर्यंत २०२०-२१ या आर्थिक वर्षातील सर्व प्रकारच्या कामांची देणी देण्यात आली असून केवळ कार्यादेश देऊन कामे सुरु करण्यात आलेल्या कामांची देणी देणे शिल्लक असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे . त्यामुळे येत्या वर्षभरात ठाणे महापालिकेवर असलेला दायित्वाचा भार हा ४५० ते ५०० कोटींवर येण्याची चिन्हे असून यामुळे पालिकेला काही प्रमाणात का होईना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

कोरोना काळापासून ठाणे महापालिकेची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसल्याने कोणत्याही मोठ्या प्रकल्पांची घोषणा करण्यात आलेली नाही. तर दुसरीकडे क्लस्टर आणि रस्त्यांची कामांसाठी कोट्यवधींचा निधी हा शासनाकडून आला असल्याने याचा मोठ्या प्रमाणात फायदा हा ठाणे महापालिकेला झाला आहे. परिणामी गेल्या दोन वर्षात किरकोळ आणि अत्यावश्यक कामे वगळता पालिकेच्या दायित्वात वाढ झालेली नसल्याचे उघड झाले आहे.

चौकट

* दायित्वाचा भार ३४०० कोटींवरून १३०० कोटींवर
* प्रत्येक वर्षी ५०० ते ६०० कोटीची बिले अदा
* २०२०-२१ या आर्थिक वर्षापर्यंतची देणी पूर्ण

शिल्ल्लक दायित्व

भांडवली – १३०० कोटी
महसुली – १५० कोटी