ठाणे: भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाची ताकद वाढवली असून शिवसेना शिंदे गटाबरोबर युती करण्यास स्थानिक पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष यांनी युती करण्यास विरोध असल्याच्या भावना प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे युतीचे भवितव्य प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या हाती गेले आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मागील आठवड्यात ठाणे शहराच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी भाजपा मंडळ अध्यक्ष, वरिष्ठ पदाधिकारी यांची मते जाणून घेतली असता भाजपच्या १०० टक्के कार्यकर्त्यांनी युती करण्यास विरोध दर्शविला आहे.
याबाबत एक मंडळ अध्यक्ष म्हणाला की शिवसेना शिंदे गटाचे सध्या ६७ नगरसेवक आहेत. युतीच्या जागा वाटपात ते या सर्व जागांवर हक्क सांगणार आहेत. आमचे २३ नगरसेवक आहेत. उरलेल्या ४० जागा या कळवा, मुंब्रा आणि राबोडी या भागातील आहेत. तेथे शिंदे गटाची ताकद नाही. त्यापैकी २० जागा आमच्या माथी मारून आमच्या ताकदीवर शिंदे गट त्यांची ताकद वाढविण्यासाठी वापर करून घेईल, अशी भीती व्यक्त करून युती न करण्याच्या भूमिकेचे समर्थन केले आहे.
शिवसेनेबरोबर ज्या-ज्या वेळी युती केली, तेव्हा-तेव्हा भाजपाच्या जागा कमी झाल्याचा ठाण्याचा इतिहास आहे. त्यामुळे शिंदे गटाबरोबर युती न करता निवडणूक झाल्यानंतर युती करावी, अशी मागणी एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने ‘ठाणेवैभव’जवळ व्यक्त केली.
भाजपा आणि शिंदे गटाची राज्यात सत्ता आहे. आमची युती ही राष्ट्रीय स्तरावर झाली आहे, त्यामुळे गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये शिंदे गटाबरोबर युती करावीच लागणार आहे, त्यामुळे स्थानिकांच्या भावनांचा विचार केला जाणार नाही, असे मत प्रदेश समितीमधील एका पदाधिकाऱ्याने व्यक्त केले.