ठामपा आपत्ती व्यवस्थापनाने पुण्यात कंबर कसली

ठाणे : पुणे शहरातील अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना, बाधित परिसरात मदतीचा हात देण्यासाठी ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षांने कंबर कसली होती. कक्षाच्या मदतीने घनकचरा विभागाच्या सफाई कर्मचाऱ्यांनी शनिवारी साचलेला गाळ, केरकचरा, रस्त्यांची साफसफाई केली. फायलेरिया विभागाकडून औषध अणि धूर फवारणी करून पुणेकरांना दिलासा दिला.

राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातले असून, ठीक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र सर्वाधिक त्रास पुणे शहराला झाला. येथील आनंद नगर, एकता नगर, विठ्ठलवाडी, सुंदर नगर, संचेती रोड, रिव्हर हूड सोसायटी, प्रगती नगर, सुंदरम नगर, कर्वेनगर आदी भागात पाऊस अणि खडकवासला धरणातील पाणी आल्यामुळे मोठा बाका प्रसंग ओढवला होता. पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे या भागात नदीचे रूप बघायला मिळाले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र पावसाचा जोर ओसरल्यावर खरी कसोटी होती. पाण्याबरोबर वाहून आलेला गाळ केरकचऱ्यामुळे परिस्थिती बिकट झाली होती. त्यामुळे ओढवलेल्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी पुणे महापालिका, नवी मुंबई महापालिका, पनवेल महानगर पालिका आदी बरोबर ठाणे महापालिकेने मदतीचा हात पुढे केला.

पुणे महानगरपालिका शहरातील अतिवृष्टीमधील बाधित नागरिकांना मदतकार्य करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महापालिकेच्या ठाणे आपत्ती विभागा मार्फत टीम शनिवारी पहाटे रवाना झाली होती. यावेळी टीमच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतः रस्त्यांची स्वच्छता करून, घरात, रस्त्यावर जमा झालेला गाळ काढला होता. रस्त्यावर ब्लिचिंग पावडर टाकली. तसेच साथीचे आजार पसरू नयेत यासाठी फायलेरिया कर्मचाऱ्यांनी औषध अणि धूर फवारणी केली. यावेळी उपायुक्त जी.जी गोदेपुरे यांच्या नियंत्रणाखाली सदरचे पथक रवाना करण्यात आले होते.

यावेळी उपायुक्त तुषार पवार, यांत्रिकी विभाग अधिकारी गुणवंत झांबरे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वाय.एम. तडवी, शयुराज कांबळे आदी अधिकारी कर्मचाऱ्यानी अथक परिश्रम घेतले. अतिवृष्टीमधील बाधितांना प्राथमिक औषधोपचार उपलब्ध व्हावे यासाठी वैद्यकीय किट, पुरेसा औषधसाठा, ओआरएस पॅकेट, पाणी व बिस्कीट आदींचा समावेश आहे. तसेच नागरिकांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी कार्डिअक ॲम्ब्युलन्स, वैद्यकीय अधिकारी आणि परिचारकांची टीम तैनात ठेवली होती.