* ९६०३ नळजोडण्या खंडित
* २०२४ मोटर पंप जप्त
* ५४७ पंपरुम सील
* ९९२३ थकबाकीदारांना नोटीसा
ठाणे: ठाणे महापालिकेने पाणी बिल थकबाकी वसुलीकरता सुरू केलेल्या धडक मोहिमेमुळे पाणी बील वुसलीचा १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. गेल्यावर्षी याच काळातील वसुलीच्या तुलनेत १८ कोटी रुपयांची जास्त वसुली झाली आहे. त्याचबरोबर, आतापर्यंत संपूर्ण महापालिका क्षेत्रात ९६०३ नळ जोडण्या खंडित केल्या असून ४११ मोटर पंप जप्त केले आहेत. तसेच, ५४७ पंप रुम सील करण्यात आले आहेत. तर, ९९२३ थकबाकीदारांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
महापालिकेची पाणी बिल रक्कम सुमारे २२५ कोटी रुपयांच्या घरात आहेत. त्यापैकी, ७६ कोटी रुपये ही थकबाकी असून चालू वर्षाची बिल रक्कम ही १४८ कोटी रुपये आहे. त्यापैकी आतापर्यंत १०६ कोटी रुपयांची वसुली करण्यात आल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली आहे. पाणी बिलाची थकबाकी न भरल्यास नळ जोडणी खंडित करून पाणीपुरवठा बंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी या वसुलीबाबत सातत्याने आढावा घेत असल्याचेही पवार यांनी सांगितले.
पाणी बिलाच्या साप्ताहिक वसुलीचे लक्ष्य निर्धारित करून पाणी बिल वसुली अभियान सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार, पाणी बिलाच्या थकबाकीसह वसुलीसाठी महापालिकेच्या सर्व प्रभागात नळ जोडणी खंडीत करणे, मोटर पंप जप्त करणे, मीटर रुम सील करण्यात येत आहेत. तसेच, पाणी बिलाचा भरणा न करता, खंडित नळ जोडणी परस्पर पुन्हा कार्यान्वित करुन घेतल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
कर्मचारी-अधिकाऱ्यांची वार्षिक वेतनवाढ रोखणार
प्रभाग समितीतील पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांच्या नेतृत्वात पाणी बिल वसुलीची मोहीम राबविण्यात येत असून कारवाईत हयगय करू नये, असे त्यांना निर्देश देण्यात आले आहे. तसेच, पाणी बील वसुलीत हयगय करणारे अभियंता आणि लिपिक यांच्यावर शिस्तभंग तसेच वार्षिक वेतनवाढ रोखण्याची कारवाईही प्रस्तावित आहे. तरी, नागरिकांनी पाणी बिल वेळेत भरावे, तसेच थकबाकीदारांनी बील भरून पालिकेस सहकार्य करावे. अन्यथा नळ जोडणी खंडित करण्यात येईल, असे उपनगर अभियंता (पाणी पुरवठा) विनोद पवार यांनी स्पष्ट केले आहे.
प्रभाग वसुली खंडित नळजोडण्या
माजिवडा मानपाडा : – २१,१२,१३,१३७ – १७६
नौपाडा – कोपरी : – १३,८३,४६,१०७ – ५२९
वर्तकनगर : – ११,१६,४६,७९४ – २१९
कळवा : – १०,९६,८९,७४९ – १३४६
उथळसर : – ०९,०३,८१,६७० – ४३५
दिवा : – ०८,७४,७५,१३९ – १६११
लोकमान्य- सावरकर : – ०७,७२,३४,८६६ – ७३४
मुंब्रा : – ०७,६१,६१,७२६- ३१३७
वागळे : – ०५,८१,४२,७३० – १४१६
मुख्यालय-सीएफसी – ०८,०३,९१,३०७ – ००००
……………………………………………………………….
एकूण : – १०६,०६,८३,२२५ – ९६०३
महापालिका कार्यक्षेत्रातील घरगुती वापरासाठी असलेल्या नळ संयोजनाच्या थकीत देयकाची चालू वर्षाच्या मागणीसह पूर्ण भरणा केल्यास प्रशासकीय आकारामध्ये १०० टक्के सूट लागू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. ही योजना ३१ मार्च २०२५ या कालावधीत लागू राहील.